नवी मुंबई : वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी बेलापूरमधील निसर्गप्रेमी भंडारे कुटुंबीयांनी डोंगरामध्ये सहा किलोमीटर परिसरामध्ये ४० ठिकाणी पाणपोई सुरू केल्या आहेत. या पाणपोई पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरू लागल्या आहेत. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. दिवा ते दिवाळेपर्यंत खाडीकिनारा व दिघा ते बेलापूर दरम्यान डोंगररांगा व जंगल परिसर लाभला आहे, पण तीव्र उकाड्यामुळे जंगलातील पाण्याचे झरे आटले असून, पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, त्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. पक्ष्यांचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी बेलापूरमधील निसर्गप्रेमी अर्चना भंडारे, पती गजानन त्यांचा मुलगा कौस्तुभ व क्षितिज या चौघांनी डोंगरांमध्ये झाडांच्या फांद्यांवर ४० पाणपोई सुरू केल्या आहेत. पाण्याच्या बॉटल मध्येच कापून त्या झाडाच्या फांद्यांवर पक्ष्यांना पाणी पिता येईल, अशा पद्धतीने बांधल्या जात आहेत. या बॉटलमध्ये प्रत्येक दोन दिवसांनी पाणी भरले जात आहे. डोंगरावर पाणी नसल्याने पायथ्यापासून २० लीटरच्या कॅन भरून त्या सहा किलोमीटर परिघामधील पाणपोर्इंपर्यंत नेल्या जात आहेत. एक महिन्यापासून नियमितपणे पक्ष्यांना पाणी देण्याचे काम सुरू असून, अजून २० ठिकाणी नवीन पाणपोई सुरू केल्या जाणार आहेत. पाणपोई बसविताना त्या परिसराची पाहणी करण्यात आली. पक्ष्यांची वर्दळ कोणत्या परिसरात असते. आंबा व इतर फळझाडे कुठे आहेत, याचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या अभियानामध्ये अजूनही नागरिक सहभागी होऊ लागले आहेत. जूनअखेरपर्यंत ऊन्हाची तीव्रता अशीच राहणार आहे. यामुळे प्रत्येक नागरिकांनी त्यांना शक्य त्याप्रमाणे पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही अर्चना भंडारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी) तीव्र उकाड्यामुळे जंगलातील पक्ष्यांचाही मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी आम्ही बेलापूरच्या डोंगररांगांमध्ये ४० ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. अजून २० ठिकाणी सुरू केली जाणार आहे. प्रत्येक दोन दिवसांनी प्रत्येक बॉटलमध्ये पाणी भरण्यात येत आहे. - अर्चना गजानन भंडारे, निसर्गप्रेमी, बेलापूर
डोंगररांगांमध्ये पक्ष्यांसाठी पाणपोई
By admin | Published: April 12, 2017 2:56 AM