माथेरानमध्ये पाणीकपात
By admin | Published: April 9, 2016 02:24 AM2016-04-09T02:24:13+5:302016-04-09T02:24:13+5:30
माथेरान वाढीव पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे तीनतेरा वाजले असून त्याचा परिणाम माथेरानकरांना ऐन पर्यटन हंगामामध्ये भोगावा लागणार आहे.
कर्जत : माथेरान वाढीव पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे तीनतेरा वाजले असून त्याचा परिणाम माथेरानकरांना ऐन पर्यटन हंगामामध्ये भोगावा लागणार आहे. बहुचर्चित पाणी योजनेचे काम यावर्षी तरी पूर्ण होईल, ही आशा येथील नागरिकांमध्ये होती. निदान या वर्षी तरी पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे वाटत होते. परंतु मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याने अचानक माथेरान बाजारपेठेत राम चौकात एक दिवसाआड संपूर्ण माथेरान शहराला पाणीपुरवठा केला जाईल, असा फलक लावल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले. माथेरान शार्लेट तलावामध्ये मुबलक पाणी असतानादेखील असा फलक का लावण्यात आला, अशी चर्चा शहरात चालू आहे.
माथेरान शहराला, वाढत्या लोकसंख्येला व दरवर्षी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता १९८९ मध्ये शासनाने वाढीव पाणी योजना नेरळ कुंभा उल्हास नदीतून पाणीपुरवठा चालू केल्याने माथेरानकारांची थोड्या प्रमाणात पाण्याची समस्या संपुष्टात आली. परंतु काही वर्षांतच नेरळ-माथेरानकरिता वापरलेली पाइपलाइन निष्कृष्ट दर्जाची असल्याने जागोजागी फुटत गेली व लाखो लीटर पाणी वाया जाऊ लागले. विशेष म्हणजे ही जी निष्कृष्ट दर्जाची पाइपलाइन वापरली होती, त्यासाठी त्या ठेकेदारची चौकशी देखील केली नाही व ती पाइपलाइन जुनी व पूर्णपणे निकामी झाल्याने माथेरानकरांना पुन्हा पाण्याची टंचाई भासू लागल्याने कर्जत आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नातून अनुदानातून निधी उपलब्ध करून झाला, व पाइपलाइन टाकण्याचे कामही चालू झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे आजही काम पूर्ण झाले नसल्याने व टाकलेल्या नवीन पाइपलाइनमधून पाणीगळतीहोत असल्याने लाखो लीटर पाणी दररोज वाया जात आहे.