उल्हासनगरात पाणीबाणी

By Admin | Published: May 10, 2016 02:03 AM2016-05-10T02:03:27+5:302016-05-10T02:03:27+5:30

विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे.

Waterfall in Ulhasnagar | उल्हासनगरात पाणीबाणी

उल्हासनगरात पाणीबाणी

googlenewsNext

उल्हासनगर : विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे. त्यामुळे शहरात नव्याने आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको होण्याची भीती आहे.
शहराच्या पूर्व भागात उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावण्यात आला आहे. त्यानंतरही कॅम्प नंबर-४ च्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून टंचाई कायमच आहे.
उल्हासनगरला एमआयडीसीकडून दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पालिकेने पाणीपुरवठ्यातील सुसूत्रतेसाठी विभागवार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले. मात्र, कमी दाबाच्या आणि असमान पुरवठ्यामुळे टंचाई वाढते आहे. पूर्व भागाला पाले गावावरील मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याचा दाब वाढावा म्हणून आयुक्त मनोहर हिरे यांनी व्हॉल्व्ह बसवला आहे. मात्र, त्याचा फायदा पूर्वेला न होता फक्त कॅम्प नंबर-५ ला होतो आहे.
४ नंबरला चांगल्या दाबाने पुरवठा होण्यासाठी आयुक्त मनोहर हिरे यांच्यासोबत सभागृह नेते धनंजय बोडारे, स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे, नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी चर्चा केली. कॅम्प नंबर-४ च्या परिसरातील जलवाहिनीत गळती असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांचे विशेष पथक जलवाहिन्यांची चाचणी घेत असून गळतीचा शोध घेत आहे. कॅम्प नंबर-४ च्या परिसरातील संभाजी चौक, राहुलनगर, दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, सुभाष टेकडी, भारतनगर, नागसेननगर, समतानगर, लालचक्की, भीमनगर, ओटी सेक्शन, संतोषनगर, सिद्धार्थनगर आदी परिसरांत पाणीटंचाई कायम आहे.
नगरसेवक विजय तायडे, राजेश वानखडे, नगरसेविका अंजली साळवे, शैलजा सोनताटे, मंदा सोनकांबळे, जयश्री कांबळी, रमेश चव्हाण, सुरेश जाधव, अनिता भानुशाली यांनीही पाणीटंचाईबाबत नाराजी व्यक्त करून पुन्हा आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको आंदोलने करायची का, असा प्रश्न विचारला आहे.
>ठाण्यात आज पाणी नाही, मुंब्रा-कळव्यालाही फटका
स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतू पार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी आदी परिसरांत पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तर, बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी ४० टक्के पाणीकपात करण्याचे कळवले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असून या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ या परिसराचा (एमआयडीसीकडून होणारा) पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे.

Web Title: Waterfall in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.