धबधबे ठरत आहेत धोकादायक; बंदी आदेशाचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:46 PM2019-08-03T22:46:09+5:302019-08-03T22:46:22+5:30
लहान-मोठे ओहोळाचेही पर्यटकांना आकर्षण
- वैभव गायकर
पनवेल : खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर वनविभागाने प्रवेशबंदी केली आहे. मात्र परिसरातील डोंगरकडांमधून अनेक लहानमोठे धबधबे वाहत असून पर्यटकांच्या पसंतीत उतरत आहेत. त्यामुळे वीकएण्ड, सुटीच्या दिवशी याठिकाणी मोठी गर्दी होते. मात्र पांडवकड्याबरोबरच परिसरातील लहान मोठे धबधबेही पर्यटकांसाठी धोकादायक असल्याचे शनिवारी घडलेल्या घटनेत समोर आले आहे. फ्रेंडशीप डे साजरा करण्यासाठी शनिवारी सात जण गोल्फ कोर्सच्या मागील बाजूस असलेल्या धामोळे आदिवासी वाडीजवळील लहान धबधब्यावर आले होते. येथील ओढ्याचा प्रवाह वाढल्याने चार विद्यार्थीनी वाहून गेल्या.
पांडवकडा धबधब्यावर बंदी असल्याने पोलीस व वनविभागाचे याठिकाणी बंदोबस्त असतो. त्यामुळे पर्यटक परिसरातील लहान मोठ्या धबधब्यांकडे आपला मोर्चा वळवतात. यामध्ये मुंबईसह उपनगरातील पर्यटकांची संख्याही मोठी असते. खारघरमधील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसताना पर्यटक अतिउत्साहात दिसेल तो धबधबा, ओहोळात मौजमजेसाठी उतरतात. त्याठिकाणी पाण्याची खोली, प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना घडतात.
पांडवकड्यावर बंदी झुगारून प्रवेश करणाऱ्या ४० पेक्षा जास्त पर्यटकांवर यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र कारवाईपासून सुटका व्हावी, म्हणून काही अतिउत्साही पर्यटक पांडवकडा परिसरात विविध पयार्यी मार्गाने प्रवेश करून जीव धोक्यात घालतात.
खारघर शहरातील गोल्फ कोर्सच्या मागील बाजूस सिडकोने ड्रायविंग रेंज म्हणून परिसर विकसित केला आहे. खारघर टेकडीला लागून असलेला हा परिसर पांडवकडा धबधब्याला पर्याय म्हणून नव्याने प्रसिद्ध होत आहे. याच ठिकाणी असलेला एका लहान धबधब्याचे पाणी ओढ्यातून वाहत जाते. पर्यटकांची याठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी अतिवृष्टीमुळे ओढ्याचा प्रवाह अचानक वाढला. आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चौर विद्यार्थीनी बुडाल्या.
खारघर शहरातील सेक्टर ५ नदीच्या शिपोरी म्हणून अशाचप्रकाराचा धोकादायक ठिकाण ठरत आहेत . रविवारी संपूर्ण खारघर शहरातील विविध लहान मोठ्या धबधब्यावर भेट देणाºया पर्यटकांची संख्या चार ते पाच हजारांवर पोहचते.
पांडवकडा व परिसरात आजवर
७० पेक्षा जास्त पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे वनविभागाने धबधब्यावर बंदी घातली आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेले खारघर शहारातील धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. मात्र उत्साहाच्या भरात पर्यटक सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेत नसल्याने दुर्घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे.
अतिउत्साही ४८ पर्यटकांवर गुन्हे
पांडवकडा धबधब्यावर येण्यास बंदी असताना अनेक पर्यटक बंदी झुगारत आहेत. दोन आठवड्यात खारघर पोलीस ठाण्यात ४८ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पर्यटकांना वेळोवेळी सतर्क करण्यात येते. मात्र तरी देखील पर्यटक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात . खारघर शहरात अनेक धोकादायक ठिकाणे असल्याने पर्यटकांनी उत्साहाच्या भरात धोकादायक ठिकाणांवर जावून जीव धोक्यात टाकू नये.
- प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खारघर पोलीस ठाणे