मयूर तांबडे , पनवेलमहाराष्ट्र सरकारने टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्यात राबविले. काही प्रमाणात हे अभियान यशस्वीही झाले. मात्र, पनवेल तालुक्यात तब्बल २२ लाख ९४ हजार निधीचा वापर करून बांधलेल्या जलयुक्त शिवारात एप्रिल महिन्यात एक थेंबही पाण्याचा शिल्लक नाही. परिणामी, आजूबाजूच्या आदिवासीवाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे.अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. याच धर्तीवर पनवेल तालुक्यातील धोदाणी येथे २६ जानेवारी २०१५ रोजी पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते जलशिवार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मालडुंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेली मालडुंगे, धोदाणी, धामणी, देहरंग, आदी गावे येतात. उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे, माथेरानच्या डोंगरावरून वाहून येणारे पाणी गाढी नदीतून खाडीला जाऊन मिळते. पाणी जिरत नसल्याने बहुतांशी गावात दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई होणार नाही. कृषी विभागाच्या अखात्यारीत असलेल्या या कामाकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग आदींचे सहकार्य घेण्यात आले. मात्र, जवळपास २३ लाख रु पये खर्च करून बांधलेल्या या जलयुक्त शिवारात पाणीच शिल्लक राहत नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या नावीन्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. जलयुक्त अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील धोदाणी परिसरात पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याच्या कामाला सुरु वात करण्यात आली होती. मात्र, यातील पाणी नवीन वर्षाच्या सुरु वातीलाच आटल्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वाढते तापमान आणि पाणीटंचाई यामुळे येथील आदिवासी बांधव हैराण झाले असून यावर उपाययोजना करून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आहेत.
पनवेलमधील जलशिवार कोरडा ठाक
By admin | Published: April 17, 2017 4:27 AM