वैभव गायकरपनवेल : राज्यासह अनेक मोठमोठ्या शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आठवडाभराचा अल्टिमेटम दिला आहे. शाळा, महाविद्यालये, ट्रेन, सर्व आस्थापना सुरू झाल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
९ महिन्यांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊन परवडणारे नाही. यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पनवेल महानगरपालिकेने कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन योग्यरीत्या होत नसल्यास दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसात पनवेल महानगरपालिकेने दोन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
लॉकडाऊच्या कार्यकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जणांचे उद्योगधंदे डबघाईला गेले असल्याने लॉकडाऊन नकोच अशीच भावना अनेकांची आहे. ट्रेन सुरू झाल्याने पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे निदर्शनास येताच पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने याबाबत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
नजीकच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांची बेजबाबदार वर्तणूक वाढली असल्याने प्रशासनाने अशा नागरिकांविरोधात कडक धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. पनवेल परिसरात एमआयडीसी तसेच अनेक प्रकारच्या लहानमोठ्या आस्थापनात मोठ्या संख्येने मजूरवर्ग तसेच नोकरदार वर्ग कार्यरत आहे. लाखोंच्या संख्येने नागरिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊनची भीती अनेकांना सतावू लागली आहे.