नवी मुंबई: मराठी नेहमी तहात ठरले आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला आता तह नकोय हक्क पाहिजे अशी भूमिका मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलकांचे भगवे वादळ काल रात्री नवी मुंबईत येऊन धडकले. सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाज यांचा जनसागर उचलला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईतच रोखण्याच्या दृष्टीने सरकारच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यावर तरुण आंदोलकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य सरकारकडून प्रत्येक वेळी आश्वासनावर बोलवण केली जात आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, असा निर्धार बीडच्या धनंजय शिंदे या तरुणाने व्यक्त केला आहे. तर आता वाटाघाटी किंवा तह नको, संपूर्ण आरक्षण हवय. सरकारची कोरडी आश्वासने पुरे झाली, असे लातूरच्या प्रशांत पाटील या युवकांनी स्पष्ट केले आहे.