शाळेला चाललो आम्ही...
By Admin | Published: June 16, 2017 02:36 AM2017-06-16T02:36:00+5:302017-06-16T02:36:00+5:30
उन्हाळी सुट्टीला पूर्णविराम मिळाला असून नव्या शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिला दिवसाची आठवण जपता यावी याकरिता शहरातील
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीला पूर्णविराम मिळाला असून नव्या शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिला दिवसाची आठवण जपता यावी याकरिता शहरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, खाऊ आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांची उधळण करण्यात आली. शाळेचा हा पहिला दिवस उत्साहात साजरा झाला असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.
शाळेबाहेर रांगोळ््या काढण्यात आल्या असून, सूचना फलक, फळे सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराभोवती शिक्षकवर्ग, कर्मचारी स्वत: उभे राहिले होते. शहरातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून शालेय परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पहायला मिळाला. सीबीडीतील भारती विद्यापीठ शाळेच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला असून प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देण्यात आले. शिक्षकांनी शाळेतील फळे, सूचनाफलक सजविण्यात आले होते. सर्व शिक्षण अभियानातंर्गत पुस्तक दिन साजरा करण्यात आला असून शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी कासारे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले.
बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूलमध्येही विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. प्रवेशोत्सव कार्यक्रमातंर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्या उत्कर्ष मंडळ संस्थेचे शिक्षण सभापती संदीप पाटील, मुख्याध्यापक साहेबराव सोनवणे, पर्यवेक्षक अनिल नेहते, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. वाशीत सेंट लॉरेन्स शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संगीत, नृत्य आणि नाटक सादर केले. शिक्षकांनी नाटकातून शेतकऱ्याची व्यथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. ऐरोलीत सेंट झेवियर्स हायस्कूलच्या वतीने देशभक्तीपर गीत, पपेट शो सादर केला. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
विद्यार्थ्यांना मित्र कसे निवडावे, चांगल्या संगतीचे परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. पहिला दिवस उत्साहात साजरा झाला.
- सायरा केनेडी,
मुख्याध्यापिका, सेन्ट लॉरेन्स, वाशी
शाळेचा पहिला दिवस हा एक आठवणीतला दिवस व्हावा याकरिता प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे शाळेतील शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
- संदीप पाटील,
विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर