कमिटी जाताच मोबाइल टॉयलेट उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:16 AM2019-03-01T00:16:00+5:302019-03-01T00:16:42+5:30
महापालिकेचा देखावा : हागणदारीमुक्त अभियानाचा बोजवारा
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : स्वच्छ सर्वेक्षणाकरिता बाहेरून पथक येणार असल्याने कळंबोलीत झोपडपट्टीसह इतर ठिकाणी मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते. मात्र, पथक मागे गेल्यानंतर ते टॉयलेट उचलण्यात आले आहे. यावरून महापालिकेचा दिखावा उघडकीस आला आहे. त्याचबरोबर हागणदारीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण महापालिका हद्दीत असल्याने कळंबोली सेक्टर १३ येथील झोपडपट्टीलगत मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर सिंग सिटी रुग्णालयाजवळील झोपड्या तोडल्या तरी तिथे मोबाइल टॉयलेट दिसून येत होते. त्याकरिता पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. मात्र, पाणी नसल्याने या टॉयलेटचा वापर होतो की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याशिवाय इतर काही ठिकाणी कमिटी येणार असल्याने मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते. त्याकरिता महापालिकेने एजन्सी नेमली होती. कमिटी गेल्यानंतर काही दिवसांतच या ठिकाणचे मोबाइल टॉयलेट उचलण्यात आले. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा फक्त दिखावाच आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
गेल्या वर्षीही तीच गत
गेल्या वर्षी महापालिकेने झोपडपट्टी, ट्रक पार्किंग आणि समाविष्ट गावांच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट ठेवले होते. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण असल्याने ते टॉयलेट काही दिवस तिथे ठेवण्यात आले होते. एका सामाजिक संस्थेकडून ही सेवा पुरविण्यात आली, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, ती संस्था नेमकी कोणती याबाबत एक शब्दाची माहिती बाहेर आली नाही. कमिटी गेल्यानंतर रात्रीच हे सर्व टॉयलेट संबंधितांकडून काढून नेल्यात आले.
स्वच्छता ही नागरिकांकरिता झाली पाहिजे, कोणाला दाखविण्यापुरती ती नसावी. महापालिका कमिटी येणार असल्याने मोबाइल टॉयलेट ठेवणे हा दिखावा कशासाठी? असा आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. जशी कमिटी गेली त्यानंतर टॉयलेट गायब झाले. आता थेट पुढच्या वर्षीच येथे मोबाइल टॉयलेट दिसतील.
- सतीश पाटील,
स्थानिक नगरसेवक, कळंबोली
झोपडपट्टीधारकांची गैरसोय होऊ नये, तसेच उघड्यावर शौचास बसू नये, यासाठी ते ठेवले होते. हे टॉयेलट भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. आता आपण येथे कायमस्वरूपी टॉयेलट राहतील, अशी व्यवस्था करणार आहोत.
- प्रशांत रसाळ,
अतिरिक्त आयुक्त,
पनवेल महापालिका