...अन्यथा महापालिका मुख्यालयाला घेराव घालू; जनतेच्या प्रश्नांवरून गणेश नाईक कडाडले
By कमलाकर कांबळे | Published: October 19, 2023 07:51 PM2023-10-19T19:51:10+5:302023-10-19T19:51:56+5:30
समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याची बाब नाईक यांनी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
नवी मुंबई : महापालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे होत नाहीत. प्रस्तावित असलेली अनेक कामे जनतेच्या हिताच्या विरोधात आहेत. हा प्रकार थांबला नाही तर महापालिका मुख्यालयाला घेराव घालू, असा इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गणेश नाईक यांनी गुरूवारी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या मागणीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सिडको आणि एमआयडीसीकडून महापालिकेने सुविधा भूखंड प्राप्त करून घेण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याची बाब नाईक यांनी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच एमआयडीसीने सर्व्हिस रोडच्या कडेला चुकीच्या पद्धतीने भूखंडांचे वाटप केले आहे. ते तत्काळ रद्द करून करण्याची मागणी त्यांनी केली. पाणीपुरवठा करण्याबाबत राजकारण होत असल्याबद्दल नाईक यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. काही घटकांच्या दहशतीखाली कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पाण्याचे राजकारण चालू देणार नाही. सर्वांना पाणी मिळालेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. घणसोली येथील फोर्टी प्लसचे मैदान खेळासाठीच राहिले पाहिजे. बिल्डरच्या घशात ते घालू देणार नाही, असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेने नर्सरी ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय सुरु करण्याची मागणी केली. मराठी, हिंदी विषय सक्तीचे करून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे. अमर्याद इमारती बांधून नवी मुंबईचा कोंडवाडा करू नका. त्यामुळे नवी मुंबईतील सुविधांवर ताण निर्माण होईल. नवी मुंबईतील नागरिकांना त्रासात टाकू देणार नाही, मोरबे धरणाच्या जलवाहिनीवरून नवी मुंबईबाहेर पाणीपुरवठा करण्यासाठी बेकायदा जलवाहिनी टाकण्याचा घाट घालण्यात आला आहे. ही गंभीर बाब असून, या प्रकारची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास जनतेच्या हितासाठी महापालिकेला घेराव घातला जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला आहे.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, संपत शेवाळे आदी उपस्थित होते.