नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुरक्षित नवी मुंबईकर हेच आमचे ध्येय आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून गुन्हे शाखेच्या बळकटीकरणासह हद्दवाढीसाठी पावले उचलली जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी दिली. नवी मुंबईच्या सुरक्षिततेविषयी पोलिसांची भूमिका व गुन्हे नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याविषयी त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ कार्यक्रमांतर्गत मनमोकळ्या गप्पा मारल्या. वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्ह्यांचे प्रमाण व स्वरूप बदलत आहे. सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड, ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणे या गुन्ह्यांवर गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. राज्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण चांगले आहे. भविष्यात पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हे प्रकटीकरण व ते सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येईल. गुन्हे शाखेचे बळकटीकरण करण्यात येईल. शहरात अनेक महत्त्वाचे उद्योग आहेत. त्यामुळे घातपाती कारवाई होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही रंजन त्यांनी स्पष्ट केले. सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहे. आयुक्तालय क्षेत्रातील सायबर सेल तज्ज्ञांच्या मदतीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या विभागात अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश करण्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. चोरीच्या घटना वारंवार घडतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याआधारे अनेक चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. वाढत्या उद्योगांमुळे आर्थिक गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा गुन्ह्यांमध्ये योग्य सहकार्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करू
By admin | Published: July 24, 2015 3:02 AM