लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अवैधरित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल व नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून ५ पिस्तूल व ६ काडतुसे हस्तगत केली असून, अटक केलेल्यांमधील दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ही पिस्तूल कोणाला विकली जाणार होती? त्याचा आगामी महापालिका निवडणुकांशी संबंध आहे का? याचाही अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
शहरात गुन्हेगारी कृत्ये वाढत असून, ती नियंत्रणात आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान पनवेल रेल्वेस्थानक परिसरात अग्निशस्त्र बाळगणारी व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप गायकवाड, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभव रोंगे, हवालदार अनिल पाटील, ज्ञानेश्वर वाघ, प्रशांत काटकर यांचे पथक तयार केले होते. त्यांनी मागील आठवड्यात पनवेल स्थानक परिसरात सापळा रचला होता. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असताना गोपाळ राजपाल भारद्वाज (२२) याला ताब्यात घेतले. यावेळी घेतलेल्या अंग झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगमध्ये ४ पिस्तूल व ४ काडतुसे आढळली. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून, ही शस्त्रे घेऊन विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. याचदरम्यान नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात काहीजण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंग भोसले यांनी उपनिरीक्षक संजय रेड्डी, हवालदार मंगेश वाट, नितीन जगताप, किरण राऊत, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम यांचे पथक केले होते.
सापळ्यात शारून उर्फ कुन्निकृष्णन सापळ्यात शारून उर्फ कुन्निकृष्णन शालिनी हा १ पिस्तूल व दोन काडतुसांसह पोलिसांच्या हाती लागला. हे पिस्तूल त्याने कऱ्हाडमधील अल्तमेश उर्फ मोन्या तांबोळी याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने कऱ्हाड येथून मोन्याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कऱ्हाड व लगतच्या परिसरात आर्म्स ॲक्टचे ५ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही पथकांनी पाच पिस्तूल हस्तगत केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, अतिरिक्त आयुक्त महेश घुर्ये यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.