लोकमत न्यूज नेटवर्करोहा : तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीत पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यामुळे हा व्हिडीओ खोटा आहे, या दृश्यातील पाण्याची टाकी वरसे विभागातील नाही, अफवांवर विश्वासू ठेवू नका अशी उत्तरे देण्याचा बाका प्रसंग ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर आला आहे. अत्यंत उंचावर असलेली पाण्याची टाकी खाली कोसळत असताना, त्याचवेळी अनेक तरुण पळत आहेत. त्यानंतर पाण्याची टाकी रस्त्यावर खाली पडली आणि त्यातून हजारो लिटरचे पाणी वाया जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे, अशा प्रकारचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र अफवा पसरली. काय झाले? कसे झाले, खरे आहे का ? अशी विचारणा सुरू झाली. यामुळे सरपंच, ग्रामसेवकांना अफवा असल्याचे सांगताना नाकीनऊ आले. अखेर खोडसाळ व्हिडीओ व्हायरल विरोधात वरसे ग्रामपंचायतीने रोहा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात सायबर गुन्हेगार पकडला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहा शहराला लागून असलेली वरसे ग्रामपंचायत आधीच विविध मुद्द्यांनी कायम चर्चेत आहे. यामुळे साऱ्यांचे याकडे लक्ष आहे.वरसे ग्रामपंचायतीत पाण्याची टाकी कोसळली असा धक्कादायक व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. मात्र, वरसेत अशी घटना घडलीच नाही, व्हायरल व्हिडीओे खोडसाळ आहे, कोणीतरी बदनामीचे कारस्थान केले असे स्पष्टीकरण ग्रामसेवक आर.एस.पाटील यांनी दिले, तर त्या अज्ञाताबाबत रोहा पोलिसांत तक्र ार केल्याची माहिती सरपंच मीना म्हात्रे यांनी दिली. पाणी, रस्ते, गटारे कसलेच नीटनेटके नियोजन नाही, जास्तीची मुभा दिलेल्या मुख्यत: बाहेरील बिल्डरांच्या अव्वाच्या सव्वा बांधकामांनी उद्याच्या सुस्थितीत नागरीकरणात अडथळा निर्माण केला अशा अनेक समस्यांमुळे वरसे ग्रामपंचायत कायम चर्चेत आहे.
वरसे येथील पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल
By admin | Published: July 05, 2017 6:37 AM