नवी मुंबई : शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने शहरांमध्ये शेतकरी आठवडे बाजार सुरू केले आहेत. महापालिकेकडून आठवडे बाजार भरणारी मैदाने विविध खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येत असल्याने रस्त्यावर आठवडे बाजार भरू लागले आहेत. महापालिकेच्या उदासीन नियोजनामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका बळावला आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट शहरात विक्री करता यावा यासाठी शहरात आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कृषी पणन मंडळाकडून शेतकºयांना शहरात विविध ठिकाणी संपूर्ण आठवडा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. याला अनुसरून नवी मुंबई शहरातदेखील शेतकºयांना विविध ठिकाणी मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकºयांनी आपले गट आणि कंपन्या बनवून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नवी मुंबई शहरात सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शेतकरी आठवडे बाजाराला देण्यात आलेली मैदाने महापालिका खासगी कार्यक्रमासाठी देखील भाड्याने देत आहे. कार्यक्र म संध्याकाळी असताना सकाळी असलेल्या आठवडे बाजाराला मैदानांमध्ये जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे रस्त्यावर आठवडे बाजार सुरू होऊ लागले आहेत.शेतकरी शेतमाल घेऊन आलेली वाहने, व्यवसायासाठी लावण्यात येणारे शेड आणि ग्राहकांची वर्दळ यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महापालिकेचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांच्या आणि आठवडे बाजाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, मैदानावरील कार्यक्रम काळात महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
मैदानातील कार्यक्रमांमुळे आठवडे बाजार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:15 AM