पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरू असलेले आठवडी बाजार नियंत्रणात आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणण्यात आला आहे. महासभेची मंजुरी मिळताच नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास प्रशासनाला वाटतो आहे.सोमवारी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपूर्वी नगरपालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, पनवेल तसेच तळोजा एमआयडीसीमध्ये आठवडी बाजार भरवले जातात. स्थानिक वरदहस्त असलेल्या राजकीय पुढारी, पोलीस व प्रशासनातील काही अधिकाºयांचा या आठवडी बाजाराला अर्थपूर्ण पाठिंबा असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. वाहतुकीला अडथळा तसेच त्यामुळे विविध नागरी प्रश्न उद्भवू लागल्याने महापालिकेने मध्यंतरी या आठवडी बाजारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद झाले होते. परंतु आजही काही भागात हे बाजार भरत असल्याने शहरातील सर्व आठवडी बाजार नियंत्रणात आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या आठवडी बाजारावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे स्थानिक पुढारी व गुंडांच्या पाठिंब्यावर सर्रासपणे बाजार भरविले जातात. परंतु आता या बाजारांवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे.पनवेल महानगर पालिका क्षेत्रात वीसपेक्षा जास्त आठवडी बाजारांचा समावेश आहे. ठरावीक वाराला आठवड्यातून एकदा हे बाजार भरत आहेत. या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर सूचना हरकती मागविल्या जाणार आहेत. यासंदर्भात सिडकोबरोबरसुध्दा चर्चा केलीजाणार असल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.आठवडी बाजार नियमित केले जाणार नाहीत. त्यावर फक्त नियंत्रण ठेवले जाणार आहे. तशा आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त महसूल मिळणार आहे.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगर पालिका
पनवेलमध्ये आठवडी बाजार नियंत्रित होणार ; सर्वसाधारण सभेत प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:32 PM