नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:32 AM2020-03-18T02:32:28+5:302020-03-18T02:32:43+5:30
निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. २३ मार्चला अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. परंतु निवडणूक प्रक्रिया आहे त्या स्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत याविषयी काहीही कार्यवाही होणार नाही. या निर्णयाचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. निवडणुकीपेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सीवूडमधील पदाधिकारी समीर बागवान व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ सेक्टर ६ मधील पदाधिकारी महादेव पवार यांनी दिली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांमधून कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रारूप मतदार याद्या मिळाल्या असल्यामुळे प्रभागामधील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, कोण कोणत्या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहे, स्थलांतर झालेले मतदार कुठे वास्तव्यास आहेत याविषयी माहिती संकलित करणे व त्यांच्यापर्यंत पोहोचणे इच्छुकांना शक्य होणार आहे. याशिवाय प्रभागामधील प्रचारासाठीचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.