ढोलताशांच्या गजरात स्वागत
By admin | Published: April 9, 2016 02:29 AM2016-04-09T02:29:26+5:302016-04-09T02:29:26+5:30
मराठी नववर्षाचा प्रथम दिन म्हणजेच गुढीपाडवा. यानिमित्त शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते
नवी मुंबई : मराठी नववर्षाचा प्रथम दिन म्हणजेच गुढीपाडवा. यानिमित्त शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलताशा पथकांची प्रात्यक्षिके, महिलांच्या बाईक रॅली तसेच पारंपरिक पध्दतीने गुढी उभारून मंगलमय वातावरणात गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली या सर्वच विभागांमध्ये शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. सीबीडी- बेलापूर येथे आयोजित शोभायात्रेत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी शोभायात्रेच्या माध्यमातून जल हैं तो, कल हैं हा मोलाचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सीबीडी सेक्टर ८ कालीमाता मंदिर येथून निघालेल्या या शोभायात्रेचा शेवट सेक्टर २ येथील अलबेला हनुमान मंदिर येथे झाला. या शोभायात्रेला आमदार मंदा म्हात्रे, नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील, सुलेखनकार अच्युत पालव यांची विशेष उपस्थिती होती.
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी घणसोली येथील आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली सेक्टर ५ येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेची सांगता वाशीतील शिवाजी चौकात करण्यात आली. त्यामध्ये परिसरातील नागरिकांनी तसेच मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. इंग्रजी नववर्षाचे स्वागत तरुणांकडून मद्यप्राशन करून साजरे होत असल्याने देशाची भावी पिढी भरकटत चालली आहे. यामुळे तरुणांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देत तिचे जतन करण्याच्या उद्देशाने शोभायात्रेचे आयोजन केले जात असल्याचे आयोजक राजू गावडे यांनी सांगितले.
कोपरखैरणेतील रणादेवी मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक नगरसेवक शिवराम पाटील व नगरसेविका अनिता पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व तरुण यांच्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सेक्टर २० येथून या शोभायात्रेची सुरुवात करून तलावालगत त्याची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)