नागोठणे : सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सलग सातव्या वर्षी शिवनेरी ते रायगड असा शिवरथ पालखी सोहळा संपन्न होत आहे. ३ फेब्रुवारीला शिवनेरीहून मार्गस्थ झालेल्या या शिवरथाचे सोमवारी सकाळी १० वाजता येथील शिवाजी चौकात आगमन झाले. यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि हजारो शिवप्रेमींनी शिवरथाचे जल्लोषात स्वागत केले.सोहळ्यात डॉ. नेल्सन मंडेला आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि निडी, मुरु डच्या कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ हे या कार्यक्र माचे आकर्षण ठरले होते. याबाबत मावळ, कामशेतचे सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष सचिन शेडगे यांच्याशी संवाद साधला असता, धार्मिक पूजा - अर्चा करून शनिवार ४ फेब्रुवारीला शिवनेरी गडावरून शिवरथ मार्गस्थ झाला आहे. माळशेज घाट, कल्याण, भिवंडी, कोपरखैरणे, वाशी, पनवेल, पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, माणगाव, महाडमार्गे पाचाड - रायगड असा या शिवरथाचा मार्ग आहे. सोमवारी सायंकाळी पालखी पाचाडला पोहोचणार असून मंगळवारी ७ फेब्रुवारीला पहाटे ही पालखी रायगडावर नेण्यात येणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील ३५० शिवभक्त सहभागी झाले आहेत. सलग सात वर्षे हा पालखी सोहळा होत असून दर दोन वर्षांनी पालखीचा मार्ग बदलण्यात येत असतो. आमच्या प्रतिष्ठानने दुर्ग संवर्धनाचे महत्त्वपूर्ण असे कार्य हाती घेतले आहे. ऐतिहासिक अशा किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, त्याची जोपासना व्हावी असा त्यामागचा उद्देश असून त्या अनुषंगाने शिवरायांचे अद्वितीय असे कार्य, इतिहास महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेला ज्ञात व्हावा यासाठी आम्ही पालखीचा मार्ग बदलत असतो, मात्र शिवनेरी ते रायगड असाच या पालखीचा प्रवास असतो, असे यावेळी शिवभक्तांनी सांगितले. यावेळी शिवरथाचे स्वागत करण्यासाठी शिवप्रेमी उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवरथाचे नागोठण्यात जल्लोषात स्वागत
By admin | Published: February 07, 2017 4:17 AM