नवी मुंबई : शहरवासीयांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष पाहावयास मिळाला. मावळत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे स्वागत करण्यात तरुणाईचा उत्साह वाखाखण्याजोगा होता. तर सालाबादप्रमाणे थर्टीफर्स्टसाठी शहरातील हॉटेल्स, बार अॅण्ड रेस्टॉरेंट आणि मॉल्समध्ये शहरवासीयांची एकच गर्दी दिसून आली.नव वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील हॉटेल्स व बिअर बार व रेस्टॉरेंट, मॉल्स, पंचताराकिंत हॉटेल्समधून आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध सवलती जाहिर करण्यात आल्या आहेत. काही ताराकिंत हॉटेल्समध्ये अनलिमिटेड फूड, ड्रिंक त्याचबरोबर डिजे आदी आॅफर जाहिर करण्यात आल्या आहेत. फॅमिली व लहान मुलांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले आहे. तर काही हॉटेल्स चालकांनी मद्याच्या ठराविक विक्रीवर मोफत योजना जाहीर केली आहे. रात्री दहानंतर खऱ्या अर्थाने नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला. हॉटेल्स व रेस्टॉरेंटमधून गर्दी वाढू लागली. रात्री बारा वाजल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर तरूणाईचा एकच उत्साह पाहयला मिळाला. रात्री उशिरापर्यंत युवक व युवतींचे जथ्ये शहराच्या विविध चौकात जल्लोष करताना दिसून आले. उत्साहाच्या भारात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यादृष्टीने ठिकठिकाणी पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. तर हॉटेल्स, पम आणि मॉल्स परिसरात साध्या वेषातील पोलीस लक्ष देवून होते. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, मॉल्स, क्लबमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर अबालवृध्दांनी एकच जल्लोष केला. नवी मुंबई महापालिकेचा १ जानेवारी रोजी वर्धापन दिन आहे. त्यामुळे महापालिकेच्या पामबीचवरील मुख्यालयावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पनवेल व उरण परिसरातील फार्म हाउसवर सुध्दा रात्री उशिरापर्यंत पार्ट्याचे फड रंगले होते. पहाटेपर्यंत जल्लोष सुरू होता.
नववर्षाचे जल्लोषात स्वागत; हॉटेल्स, मॉल्स हाउसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:21 AM