नववर्षाचे स्वागत जल्लोषात
By admin | Published: January 1, 2017 03:32 AM2017-01-01T03:32:06+5:302017-01-01T03:32:06+5:30
शहरवासीयांनी आज थर्टी फर्स्टचा जल्लोष करीत नववर्षाचे स्वागत केले. हॉटेलिंगपेक्षा अनेकांनी खासगी पार्ट्यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन करीत मावळत्या वर्षाला निरोप दिला.
नवी मुंबई : शहरवासीयांनी आज थर्टी फर्स्टचा जल्लोष करीत नववर्षाचे स्वागत केले. हॉटेलिंगपेक्षा अनेकांनी खासगी पार्ट्यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन करीत मावळत्या वर्षाला निरोप दिला. सेलिब्रेशनवर नोटाबंदीचा कोणताही परिणाम जाणवला नाही. असे असले तरी शहरातील हॉटेल्स आणि बीअरबारमधून ग्राहकांची उपस्थिती बेताचीच असल्याचे दिसून आले.
नवी मुंबईत खारघर, पनवेलसह जवळपास सहाशे बीअर बार आणि रेस्टॉरंट आहेत, तर जवळपास दहा तारांकित हॉटेल्स आहेत. यात तीन थ्री स्टार आणि दोन फाईव्ह स्टार हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व हॉटेल्स व बीअर बारमधून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात होती. आकर्षक रोषणाईने हॉटेल आणि परिसर उजाळून निघाले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. काही तारांकित हॉटेल्समध्ये अनलिमिटेड फूड, ड्रिंक त्याचबरोबर डीजे आदी आॅफर जाहीर करण्यात आल्या होत्या. फॅमिली व लहान मुलांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले होते. अनेक बीअर बारमध्ये थर्टी फर्स्टची विशेष आॅफर म्हणून चकना मोफत देण्याची योजना आखण्यात आली होती. तर काही हॉटेल्स चालकांनी मद्याच्या तीन पेगवर एक पेग फ्रीची योजना जाहीर केली होती. मद्य पिवून वाहने चालवू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर तळीरामांच्या सोयीसाठी अनेक हॉटेल्स चालकांनी खासगी वाहन चालक उपलब्ध केले होते. तसेच खासगी टुरिस्ट वाहनांचीही सोय करण्यात आली होती.
खासगी पार्ट्यांवर भर
विविध प्रकारचे टॅक्स व मद्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मागील काही वर्षांपासून हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट आहे. हॉटेलमध्ये जावून दारू पिण्यापेक्षा अनेक जण खासगी पार्ट्या किंवा घरीच एन्जॉय करणे पसंत करतात, तर थर्टी फर्स्टसाठी अनेक जण आपले कुटुंबीय किंवा मित्र मंडळीबरोबर आउटिंगला जाणे पसंत करतात. नेमका याचाच फटका यावेळी हॉटेल इंडस्ट्रीजला बसल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांची नजर
थर्टी फर्स्टच्या जल्लोषात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. शहराच्या विविध भागात जवळपास ११00 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मद्य पिवून वाहने चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात होते. शिवाय उघड्यावर चालणाऱ्या पार्ट्यांवरही निर्बंध घालण्यात आले होते.
पहाटे पाच पर्यंत रेलचेल
उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल्सला पहाटे पाच वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे पोलिसांना पहाटेपर्यंत जागता पाहरा ठेवावा लागला. नाक्या -नाक्यावर बे्रथ अॅनालायझर मशिनच्या माध्यमातून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. दारू पिवून वाहने चालवू नये, अशा सूचना केल्या जात होत्या. विशेषत: शहरातील मुख्य अंतर्गत मार्गांसह पामबीच, ठाणे-बेलापूर मार्ग व सायन-पनवेल महामार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.