नवी मुंबई : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेमध्ये नवी मुंबईमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सीवूड, सानपाडा, वाशीसह विविध भागात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. वाहन, इलेक्ट्रिक साहित्य खरेदीलाही नागरिकांनी पसंती दिली होती. दागिने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्येही गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. ठाणे व डोंबिवलीप्रमाणे नवी मुंबईलाही सांस्कृतिक नगरी अशी ओळख प्राप्त होऊ लागली आहे. गुढीपाडव्याला विभागनिहाय शोभायात्रांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. सीवूडमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, गृहनिर्माण सोसायट्या एकत्र येऊन शोभायात्रा काढून एकतेचे दर्शन घडवतात.बुधवारी जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशामधील महिलांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. ढोल-ताशांच्या गजरात सीवूडचा राजा चौकापासून ते सेक्टर ४८ मधील विठ्ठल रूक्माई मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. यावर्षी कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेला शोभायात्रेच्या नियोजनाचा मान मिळाला होता.
वाशीतील स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर २९ येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशात नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुढीची पूजा करून शोभायात्रेचा शुभारंभ झाला. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नववर्ष स्वागतयात्रा समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा पंडित, उत्सव प्रमुख सागर मटकर,माजी नगरसेवक शशिकांत राऊत, प्रकाश मोरे, प्रभाकर भोईर, शिल्पा मोरे, सुनंदा राऊत व इतर मान्यवर सहभागी झाले होते. सानपाडामध्ये अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून शोभायात्रेचे आयोजन केले होते.
वाहन खरेदीला पसंती
गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी मोटारसायकल व कार खरेदीला पसंती दिली होती. शोरुममध्ये विधिवत पूजा करून नवीन वाहने घरी नेली जात होती. नवीन वाहनांना ॲसेसरीच बसविताना शोरुममधील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.
दागिने खरेदीलाही पसंती
सोन्याचे दर वाढले तरी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी दागिने खरेदीला पसंती दिली. लग्न समारंभासाठी मुहूर्तावर दागिने खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिले होते.