शाब्बास, नवी मुंबई! स्वच्छता अभियानात तुम्ही देशात तिसरे आलात! राष्ट्रपतींकडून मिळाला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 05:47 AM2024-01-12T05:47:07+5:302024-01-12T05:49:50+5:30
नवी मुंबईने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन मिळविले
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शाब्बास, नवी मुंबईकर. आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि जबरदस्त यशही मिळविले. स्वच्छ शहरांच्या देशपातळीवरील तपासणीत नवी मुंबई शहर राज्यात पहिले आणि देशात तिसरे ठरले आहे. आता अभिमानाने सांगा...आम्ही नवी मुंबईत राहतोय..! नवी मुंबईने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन मिळविले. ओडीएफ कॅटेगिरीमध्ये सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन मिळवून लौकिक वाढविला आहे. दुसरा क्रमांक जाहीर न केल्याने नवी मुंबई तशीही देशात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळ्यात आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड उपस्थित होते.
अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मी, लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळे व सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय योगदान दिले. हा बहुमान संपूर्ण शहरवासीयांचा आहे. यापुढील काळात अभियानात सातत्य राखले जाईल. पहिला क्रमांक हा ध्यास समोर ठेवून नवीन उत्साहाने स्वच्छता अभियान राबविले जाईल.
- राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका
महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हीरो आहेत. यापुढेही आपण स्वच्छतेच्या अभियानात असेच सातत्य राखूया. -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महाराष्ट्र देशातील सर्वांत स्वच्छ राज्य
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्राने सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून अव्वल क्रमांक पटकाविला. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये नवी मुंबईने देशात तिसरा, तर एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात सासवडने (जि. पुणे) देशात प्रथम पुरस्कार मिळविला.
टॉप ५ स्वच्छ शहरे
इंदूर, सूरत, नवी मुंबई, विशाखापट्ट्णम, भोपाळ
टॉप ३ स्वच्छ राज्ये
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड