पनवेल : देशभरातील चित्रकारांनी एकत्र येऊन साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी सध्या रसिकांची मोठी गर्दी खारघरमध्ये पाहावयास मिळत आहे. देशभरातील ५२ चित्रकारांनी येथील ‘वेस्ट टेन’ गॅलरीत हे प्रदर्शन भरवले आहे. निसर्गचित्र, मानवीकृती, फ्रिगरेटिव्ह पेंटिंग, क्रिएटिव्ह, म्युरल, अमूर्तचित्र या प्रकारच्या हस्तकलेच्या कलाकृती सध्या या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. २४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात दिल्ली, पुणे, ओडिसा, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, पंजाब, कोटा या ठिकाणच्या कलाकारांनी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण नवी मुंबईमधील रहिवाशांना या प्रदर्शनाचा मोफत लाभ घेता येणार आहे. नवी मुंबईमधील ही एकमेव आर्ट गॅलरी असलेल्या वेस्ट टेन या ठिकाणी हे प्रदर्शन भरवले आहे. देशभरातील चित्रकारांच्या कलेला या ठिकाणच्या प्रदर्शनाद्वारे वाव मिळेल, म्हणूनच त्यांच्यासाठी हे व्यासपीठ खुले केलेले आहे. प्रदर्शनात विक्री होणाऱ्या पेंटिंग्सच्या ६६ टक्के रक्कम त्यांना मिळणार आहे, अशी माहिती वेस्ट टेन या आर्टगॅलरीच्या व्यवस्थापक नफिसा सलुजा यांनी दिली. चित्रकार नंदकिशोर थोरात यांनी सांगितले, मी जेजे स्कूल आॅफ आर्टस्चा विद्यार्थी आहे. माझ्या दोन पेंटिंग या ठिकाणी ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, चित्रकारांना आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळत नाही, तसेच अनेक प्रेक्षकांनाही देशभरातील विविध भागांतील कलाकारांनी आपल्या नजरेतून साकारलेल्या कलाकृती पाहण्याची अशी संधी मिळत नसल्याने दोघांना एकत्र आणण्याचे काम या प्रदर्शनाद्वारे करण्यात आले असल्याचे नंदकिशोर थोरात यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘वेस्ट टेन’मध्ये ५२ चित्रकार सहभागी
By admin | Published: January 14, 2017 7:08 AM