नवी मुंबई : १७ वर्षे वयोगटातील ‘फिफा’ वर्ल्डकप स्पर्धा नेरुळमधील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर होणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेनेही कंबर कसली आहे. मैदान विकसित करणे, उद्यान सुशोभीकरण व विद्युतविषयक कामे करण्यासाठी तब्बल ७ कोटी ७८ लाख रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.फुटबॉल हा जगातील सर्वाधिक देशांमध्ये खेळला जाणारा खेळ. फुटबॉलच्या १७ वर्षे वयोगटातील वर्ल्डकपचे ८ सामने डी. वाय. पाटील स्टेडिअमवर होणार आहेत. या मुख्य सामन्यांसाठीचे सराव सामने सीवूड दारावे येथील यशवंतराव चव्हाण मैदान व वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट असोसिएशनच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. शहरात होणाºया आठ मॅचेसपैकी ६ आॅक्टोबरला दोन, ९ आॅक्टोबरला दोन, १२ आॅक्टोबरला २ व १८ आॅक्टोबरला व २५ आॅक्टोबरला प्रत्येकी एक सामना होणार आहे. २५ आॅक्टोबरला एक सेमी फायनलचा सामनाही या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. आंतरराष्टÑीय दर्जाची स्पर्धा शहरात होणार आहे. या स्पर्धेसाठी देश-विदेशातील फुटबॉलचे चाहते व खेळाडू उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने शहरात येणाºया नागरिकांचे स्वागत करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी बेलापूर, नेरुळ, वाशी व तुर्भे परिसरांमध्ये अत्यावश्यक स्थापत्य विद्युत उद्यान व सुशोभीकरणाची कामे महापालिका करणार आहे. याशिवाय प्रचार व प्रसिद्धीसाठी परिश्रम करणार आहे.फुटबॉल सामन्यांच्या निमित्ताने शहरात जवळपास ९७ लाख रुपयांची विद्युतविषयी कामे करण्यात येणार आहेत. उद्यानविषयक कामे करण्यासाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.फुटबॉल सामन्यांसाठी प्रचार प्रसिद्धी व सुशोभीकरणाच्या कामांसाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याविषयी विशेष प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आॅगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे.>प्रकाश व्यवस्थेसाठी १ कोटी ३६ लाख ‘फिफा’ वर्ल्डकपसाठी महानगरपालिकेने यशवंतराव चव्हाण मैदानाचा विकास केला आहे. या मैदानामध्ये सराव सामने होणार आहेत. मैदानामध्ये ३०० एलयूकस एवढी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी ३० मीटर उंचीचे ४ हायमास्ट, २ किलो वॅट फिटिंगचे ४४ नग, हायमास्ट कंट्रोल पॅनलचे ४ नग, जवळपास तीन हजार मीटर क्षमतेची केबलची गरज आहे. यासाठी १ कोटी ३६ लाख रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आला.
‘फिफा’ वर्ल्डकपसाठी पालिकेने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:14 AM