गहू, तांदूळ उत्पादकांनाही बसताेय फटका; निर्यातबंदीमुळे २८,६५५ कोटींचे नुकसान; देशासाठी चिंताजनक बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:15 AM2024-05-08T09:15:32+5:302024-05-08T09:15:43+5:30
रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती.
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वर्षभरातील निर्यातबंदीचा कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल २६ पट घसरली असून वर्षभरात ४५ लाख टन कमी निर्यात झाली. त्यामुळे ११३७७ कोटींचे नुकसान झाले. तांदळाचीही ७७ लाख टन निर्यात कमी होऊन १७२७८ कोटींचे नुकसान झाले. अन्नधान्यांच्या निर्यातीमधील घट शेतकऱ्यांसाठी व देशासाठीही चिंताजनक समजली जात असून एकूण २८६५५ कोटींचे नुकसान झाले आहे.
कृषिप्रधान भारताचा अन्नधान्यांच्या निर्यातीमधील वाटा २०२३-२४ या आर्थिक वर्षात कमी झाला आहे. एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान अपेडाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गहू, तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने ७२ लाख ३९ हजार टन गहू निर्यात केला. १५८४० कोटींची उलाढाल झाली होती. पण २०२२-२३ मध्ये निर्यात घटून ४६ लाख ९३ हजार टन झाली. उलाढालही ११८२६ कोटीपर्यंत खाली आली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात गव्हाचा तुटवडा होईल या भीतीने निर्यातीवर निर्बंध टाकण्यात आले. यामुळे आर्थिक वर्षातील ११ महिन्यांत निर्यात २६ टक्क्यांनी घटून १ लाख ७९ हजार टनांवर आली. उलाढालही फक्त ४४९ कोटी रुपये झाली आहे. गहू निर्यातीमधील ही घसरण अत्यंत चिंताजनक समजली जात आहे.
भारतीय तांदळालाही जगभर मागणी आहे. २०२२ -२३ मध्ये १ कोटी ७७ लाख टन तांदूळ निर्यात केला होता. निर्यातीमधून ५१०८८ कोटींची उलाढाल झाली. २०२३-२४ वर्षात निर्यात १ कोटी टन झाली आहे.
तांदळाला जगातील १५० देशांमधून मागणी आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्बंधामुळे या निर्यातीमध्येही घट झाली आहे.
बिगर बासमती तांदूळ निर्यात
वर्ष निर्यात( टन ) किंमत(कोटी)
२०२० - २१ १३०९५१३० ३५४७६
२०२१ - २२ १७२६२२३५ ४५६५२
२०२२ - २३ १७७८६०९२ ५१०८८
२०२३ - २४ १००८१०५७ ३३८१०
गहू निर्यातीचा तपशील
वर्ष निर्यात (टन ) किंमत (कोटी)
२०२० - २१ २०८८४८७ ४०३७
२०२१ - २२ ७२३९३६६ १५८४०
२०२२ - २३ ४६९३२६४ ११८२६
२०२३ - २४ १७९८१७ ४४९