महानगर गॅस पाईपलाईन साठी खोदलेल्या खड्ड्यात बारा चाकी टेम्पोची चाके रुतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 12:13 PM2023-06-24T12:13:57+5:302023-06-24T12:15:35+5:30
महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका या टेम्पोला सहन करावा लागला.
मयुर तांबडे/नवीन पनवेल : पावसाळ्यापूर्वी महानगर गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते पनवेल महानगरपालिकेने बुजवले नसल्याने बारा चाकी टेम्पो या खड्ड्यात रुतल्याची घटना 24 जून रोजी सकाळी घडली. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका या टेम्पोला सहन करावा लागला.
एम एच 43 वाय 65 54 या क्रमांकाचा 12 चाकी टेम्पो खांदा कॉलनी ब्रिजवरून नवीन पनवेल आदई सर्कल या मार्गावरून पुढे जात होता. यावेळी येथे महानगरच्या गॅस लाईन साठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यात 12 चाकी टेम्पो रुतला. खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी पनवेल महापालिकेकडे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. मात्र जून महिन्याची 24 तारीख उलटून गेली तरी देखील पनवेल महानगरपालिकेने खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे मुरली स्वीट समोर रस्त्यावर एका बारा चाकी टेम्पोची चाके रुतली. पालिकेने वेळीच रस्त्यावरील खड्डे बुजवले असते तर त्याचा फटका या टेम्पोला बसला नसता. पावसाळा सुरू झाला आहे तरी देखील खड्डे बुजवलेले नसल्याने पालिकेचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. पनवेल पालिकेचे अभियंता संजय कटेकर यांना याबाबत विचारले असता खड्डे बुजवण्याची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.