धावत्या एनएमएमटीचे चाक निखळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:59 PM2020-02-10T22:59:22+5:302020-02-10T22:59:27+5:30
कल्याण मार्गावरील दुर्घटना : प्रसंगावधानतेमुळे जीवितहानी टळली
नवी मुंबई : धावत्या एनएमएमटीचे चाक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या वेळी चालकाने प्रसंगावधानता दाखवत बसवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
एनएमएमटी बसच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग सातत्याने घडत आहेत. बस बंद पडणे, आग लागणे, चालकांचा बेशिस्तपणा अशा प्रकारांमुळे परिवहन प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठत आहे. अशातच सोमवारी सकाळी कल्याण मार्गावरील नारायण फाटा येथे एनएमएमटीचा अपघात झाला. कल्याणवरून बेलापूर रेल्वेस्थानकाकडे जाणारी बस (एमएच ४३ एच ५०३८) त्या ठिकाणी आली असता, अचानक बसचे पुढचे एक चाक निखळले. या वेळी बसमध्ये २५ प्रवासी बसले होते. धावत्या बसचे पुढचे चाक निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशा वेळी प्रसंगावधानता दाखवत चालकाने बसवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे बस रस्त्यालगत सुरू असलेल्या कामाच्या साहित्याला धडकली.
चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे प्रवाशांवरील संकट टळले. मात्र एनएमएमटीच्या बाबतीत सतत होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून परिवहन सदस्य समीर बागवान यांनी एनएमएमटी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर या दुर्घटनेप्रकरणी वाहन तपासनीस व तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु अपघातानंतर औपचारिकता म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्याऐवजी यंत्रणेत सुधार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांसह परिवहन मंत्र्यांकडे एनएमएमटीसंदर्भात तक्रार करणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले.