२०० कॅमेरे तपासले तेव्हा गुजरातला पळून जाणारी टाेळी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:42 AM2023-12-06T09:42:58+5:302023-12-06T09:43:12+5:30
चार गुन्ह्यांची उकल, ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई : २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ५ जणांच्या टोळीला तलासरीत जेरबंद करण्यात आले. ही टोळी गुजरातला पळून जाण्यापूर्वीच नवी मुंबई पोलिस दलाच्या सीबीडी पोलिसांनी त्यांना अटक केली. या कारवाईमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले.
सीबीडी परिसरात चोरी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून तपासावर भर दिला होता. त्यासाठी उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी निरीक्षक हनीफ मुलाणी, सहायक निरीक्षक सुरेश डांबरे, उपनिरीक्षक विष्णू वाघ आदींचे पथक केले होते.
मुंबई, नवी मुंबईतील गुन्ह्यांची उकल
अटक करण्यात आलेले सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान (३५), नीलेश राजू लोंढे (२२), संजय रत्नेश कांबळे (४२), गुड्डू रामधनी सोनी (३९), विक्की राजू लोंढे (२०) हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. हे सर्व जण पोलिसांच्या हाती लागल्याने सीबीडी, खारघर, नेरूळ व मुंबईतील मालवणीतील घरफोडी, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईदरम्यान ८ लाख २२ हजारांचे २० तोळे सोने, एक फोन व रिक्षा असा एकूण ९ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपींचे पोलिस रेकॉर्ड
अथक प्रयत्नाअंती पोलिसांनी मुसक्या आवळलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यापैकी सद्दाम हुसेन याच्यावर १२, तर नीलेशवर १४ गुन्हे दाखल असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झालेे आहे.
सीबीडी परिसरात केली हाेती चाेरी
या पथकाने सीबीडी परिसरात घडलेल्या एका घरफोडीच्या तपासात परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयितांची माहिती मिळाली असता, त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली होती. या पथकांनी सराईत टोळीचा सुगावा घेत लुटारूंच्या मुसक्या आवळल्या.