पनवेल महापालिकेच्या हरकतींंवर सुनावणी कधी?
By admin | Published: July 8, 2016 03:29 AM2016-07-08T03:29:52+5:302016-07-08T03:29:52+5:30
पनवेल महापालिका स्थापनेसंदर्भात शासनामार्फत अधिसूचना काढून पालिका हद्दीतील रहिवाशांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ही प्रक्रिया घाईघाईत पार पाडल्याचा आरोप काहींनी केला.
पनवेल : पनवेल महापालिका स्थापनेसंदर्भात शासनामार्फत अधिसूचना काढून पालिका हद्दीतील रहिवाशांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ही प्रक्रिया घाईघाईत पार पाडल्याचा आरोप काहींनी केला. असे असले तरी पालिका हद्दीतून जवळजवळ चार हजारांपर्यंत हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. या सर्व प्रक्रियेला महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आलेला असताना या हरकती, सूचनांवर होणाऱ्या सुनावणीची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.
पनवेल नगरपरिषद हद्दीतील शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करुन त्यात पाच लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. पनवेल नगरपरिषदेची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली. यामध्ये दहा प्रभाग नव्याने स्थापन करण्यात आले. डिसेंबर महिन्यात पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडतील अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. हरकती व सूचनांवर जून महिन्याच्या शेवटी सुनावणी होईल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र या प्रक्रियेला विलंब होत असल्याने पनवेल महानगरपालिकेची प्रक्रिया मंदावली असून नगरपरिषदेच्या निवडणुका सर्वप्रथम पार पडतील अशी चर्चा सुरू आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामधील महानगरपलिका प्रशासन याबाबत विचारणा केली असता यासंदर्भात कोकण आयुक्त लवकरच सुनावणी घेतील असे सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात नेमकी तारीख निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात आले.
महानगर पालिका स्थापन होत असताना खारघरमधील काही संघटना, राजकीय पक्ष यांनी नियोजित पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट होण्यास प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळे खारघर शहर महानगरपालिकेतून वगळण्यात येईल अशाप्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जनसुनावणी झाल्यावरच अंतिम निर्णय होईल. येत्या १५ तारखेपर्यंत यासंदर्भात जनसुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (प्रतिनिधी)