नामदेव मोरे नवी मुंबईएनआरआय पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळाल्यामुळे उद्घाटन रखडले आहे. जुन्या गळक्या इमारतीमधून पोलीस स्टेशनचे कामकाज करावे लागत असून येथे लॉकअप नसल्यामुळे नुकतेच एका महिला आरोपीने पलायन केल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दिवाळे ते उरणपर्यंत विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोरा व एनआरआय ही दोन सागरी पोलीस स्टेशन तयार केली आहेत. एनआरआय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेलापूर गाव, सीवूड ते उलवेपर्यंतचा परिसर येतो. बेलापूर गावात १९३० साली सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या जुन्या कौलारू इमारतीमधून पोलीस स्टेशनचे कामकाज सुरू आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत गळते. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. तक्रार घेवून एकाच वेळी ५ पेक्षा जास्त नागरिक आल्यास त्यांना बाहेरील मोकळ्या जागेत उभे रहावे लागत आहे. प्रसाधनगृह पुरेसे नाही. पाणीपुरवठाही व्यवस्थित होत नाही. लॉकअपरूमच नाही. येथील आरोपींना नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये न्यावे लागते. २६ जूनला उलवे परिसरातील रियाज शेख यांच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी २ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी एक महिलेला संशयित म्हणून अटक केली. परंतु महिला पोलीस स्टेशनमधून पळून गेली. पळून गेल्याप्रकरणीही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोने महापालिका मुख्यालयासमोर एनआरआय पोलीस स्टेशनसाठी विस्तृत भूखंड दिला आहे. त्या ठिकाणी सुसज्ज पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्वागत कक्ष, कर्मचारी विश्रांती गृह, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना स्वतंत्र दालन, लॉकअप व इतर सर्व सुविधा आहेत. इमारतीमधील फर्निचरचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे नवीन इमारतीला टाळे लावून ठेवण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ते न आल्यास तितक्याच मोठ्या मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यालय उपआयुक्त विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांच्या तारखेमुळे उद्घाटन रखडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस ठाण्याचे उद्घाटन कधी?
By admin | Published: July 07, 2015 2:19 AM