मुंबई : हार्बर मार्गावरील नेरुळ-सीबीडी बेलापूर स्थानकादरम्यान एकाच रुळावर दोन लोकल समोरासमोर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर 'लोकलचा अपघात होता होता टळला', अशा चर्चांना उधाण आले. मात्र, काही वेळातच या लोकल समोरासमोर येण्यामागील सत्य समोर आले.
बेलापूर ते खारघर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळाला तडे गेल्यामुळे लोकलची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे साहजिकच मार्गावर एका पाठोपाठ एक लोकलच्या रांगा दिसून आल्या. हे पाहिल्यानंतर दोन विरुद्ध दिशेच्या लोकल समोरासमोर आल्यासारखे वाटले. त्यानंतर काहींनी या घटनेचे फोटो काढून सोशल मीडियात व्हायरल केले आणि लोकलचा अपघात होता होता टळला असे सांगितले. मात्र, रेल्वे प्रशासनाने असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून रुळाची दुरुस्ती करण्यात आली असून या मार्गावरील रेल्वे सेवा सुरू केली आहे.