नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेषत: गाव, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात वीज समस्या गंभीर बनली आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे असल्याने या क्षेत्रातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.विधानसभेच्या ऐरोली मतदार संघात सर्वाधिक झोपड्या आहेत. तसेच या विभागातील मूळ गावांत गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारली आहेत. त्यामुळे गावांतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वीज व पाणी या मूलभूत गरजा असल्याने मागेल त्याला या सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचा परिणाम म्हणून बेकायदा इमारती, झोपड्या, भंगाराची गोदामे व इतर लघुउद्योगांना विजेचा मागणी तसा पुरवठा करण्यात येत आहे. मागील पंधरा वर्षांत या क्षेत्रात विजेची मागणी वाढली आहे; परंतु वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणा जुन्याच आहेत. आजही अनेक भागात डोक्यावर लोंबकळणाºया विद्युत केबल्स पाहावयास मिळतात. भूमिगत विद्युत केबल्सचा केवळ अर्थपूर्ण फार्स ठरला आहे. डीपी बॉक्सचे केवळ सांगाडे उरले आहेत. ऐरोली, रबाळे, गोठीवली व घणसोली विभागात वीज समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून येते. या विभागात अखंडित वीज पुरवठा ही बाब स्वप्नवत झाली आहे. दिवसभरातून एकदा तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत केबल्सला आग लागणे, डीपी बॉक्समध्ये बिघाड या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात ऐन परीक्षेच्या काळात या विभागातील विद्युत पुरवठा तब्बल १७ तास खंडित राहिला. विशेष म्हणजे मागील तीन चार महिन्यात या विभागात विद्युत केबल्सला आग लागण्याच्या पंधरा ते वीस घटना घडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा संताप पसरला आहे. पंधरा वर्षांपासून या विभागातील विजेचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा प्रचाराच्या अग्रभागी राहिला आहे. डीपी बॉक्सची दुरुस्ती, अपुºया विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या वेळोवेळी घोषणा करण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही काहीच झाली नाही.
ऐरोली क्षेत्रातील वीज समस्या कधी सुटणार?; रहिवाशांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:44 PM