रायगडाला जाग येणार तरी कधी?
By admin | Published: January 15, 2017 05:40 AM2017-01-15T05:40:54+5:302017-01-15T05:40:54+5:30
पुरातत्त्व विभागाने राज्यातील ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारके म्हणून घोषित केली असून, त्यामधील सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत; पण हा देदीप्यमान ऐतिहासिक
- नामदेव मोरे, नवी मुंबई
पुरातत्त्व विभागाने राज्यातील ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारके म्हणून घोषित केली असून, त्यामधील सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत; पण हा देदीप्यमान ऐतिहासिक वारसा जपण्यास शासन व पुरातत्त्व विभागाला अपयश येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी फक्त नावालाच संरक्षित स्मारके असून, त्यांची देखभाल करण्याची यंत्रणाच नाही. खंडरात रूपांतर झालेल्या स्मारकांना पाहून इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, रायगडाला (शासकीय यंत्रणा) व शासनाला जाग कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देशाच्या व राज्याच्या इतिहासामध्ये रायगडचे नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले. मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला आजही दिमाखाने उभा आहे. जगातील शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सहा वर्षे सुरू असलेला चरीकोपरचा संप याच जिल्ह्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदाळ तळ्याचा सत्यागृह केलेले महाड येथेच.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे, चिरनेरच्या जंगल सत्यागृहापासून अजिंक्य जंजिरा किल्ला याच भूमीत दिमाखाने उभा आहे. येथील ऐतिहासिक स्थळांची दखल पुरातत्त्व विभागानेही घेतली आहे. राज्यात ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली असून, त्यामध्ये सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. पर्यटकांची पहिली पसंतीही या परिसराला मिळत आहे; पण पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात व स्मारकांची देखभाल करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पाचाड येथील वाड्याची कोसळलेली भिंत दुरुस्त केली जात नाही. समाधीस्थळाजवळील उद्यानातील तुटलेली खेळणीही बदलण्यात येत नाहीत. कुलाबा किल्ल्यावर १६ संरक्षित स्मारके आहेत; पण या सर्वांची योग्य माहिती तेथे जाणाऱ्यांना मिळत नाही. ६५ स्मारकांची एकत्रित माहितीही उपलब्ध नाही.
राजमाता जिजाऊ समाधी व वाड्याप्रमाणेच जंजिरा किल्ल्याचीही बिकट अवस्था झाली आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याची देखभाल केली जात नाही. जंजिरा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर तासनतास ताटकळत थांबावे लागते.
किल्ल्यावर वाढलेले गवत व झुडपे हटविली जात नाहीत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये वसलेल्या या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचे झरे आहेत. येथील विहिरी व तलावांमुळेच किल्ला अजिंक्य राहिला. या तलावांमध्ये सद्याच्या स्थितीमध्येही भरपूर पाणी आहे; पण तलावांची साफसफाई कधीच केलेली नाही. यामुळे या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही.
रायगड किल्ला वगळता इतर सर्वच ऐतिहासिक स्थळांची अवस्था बिकट आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी योग्य यंत्रणाच नाही. वारसास्थळांची ही अवस्था पाहून इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, शासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्वतंत्र संकेतस्थळ हवे
महाराष्ट्रात पर्यटकांची सर्वाधिक पसंती असणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे; पण येथील ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गस्थळाची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणारे एकही संकेतस्थळ नाही. जिल्हा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालयाने काही पर्यटनस्थळांचा उल्लेख केला आहे; पण त्यावरून येथील वारसास्थळांचे महत्त्व लक्षात येत नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांची माहिती व छायाचित्र असणारे संकेतस्थळ तयार करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
प्रत्येक ठिकाणी
माहिती फलक असावे
रायगड जिल्ह्यातील सर्व संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी त्या स्मारकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला शीलालेख तयार करण्यात यावा. गाईडच्या मदतीशिवाय प्रत्येक पर्यटकाला त्या ठिकाणांची माहिती उपलब्ध झाली पाहिजे. स्मारकांची डागडुजी व साफसफाई वेळोवेळी करणे आवश्यक असून त्यासाठी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक आहे.
व्हिएतनामकडून घ्यावा आदर्श
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातून प्रेरणा घेऊन व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेला हरविले. या युद्धासाठी त्यांनी तयार केलेले भुयारी मार्ग त्यांनी जपले आहेत. देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ते दाखविले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्याची देखभाल केली जाते; पण शिवरायांच्या महाराष्ट्रात व विशेषत: राजधानी रायगड जिल्ह्यातील स्मारकांची देखभाल करण्यासही शासनाला अपयश आले आहे. ऐतिहासिक स्थळांची देखभाल करण्यासाठी त्यांच्याकडून आदर्श घेण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यातील संरक्षित स्मारके
ठिकाणस्मारक
आचलोली०१
कुलाबा किल्ला१६
बिरवाडी किल्ला ०१
चौल०७
पनवेल०१
सुरगड०१
घोसाळगड०१
कडासरी कांगोरी०२
कोंडाने०१
कोर्लाली जुना किल्ला०१
अवचितगड०१
कासा किल्ला०१
नागोठणा पूल०१
पाचाड०२
पेठ०२
रायगड किल्ला१२
जंजिरा किल्ला ०१
राजापुरी येथील स्तंभ०१
तळा किल्ला०१