रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपणार कधी?, महिला प्रवाशांचा सवाल
By नारायण जाधव | Published: October 3, 2023 04:57 PM2023-10-03T16:57:13+5:302023-10-03T16:58:40+5:30
शहरातील रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपणार कधी, असा प्रश्न महिलांकडून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना करण्यात येत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील रिक्षाचालक हे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना जुमानत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. शहरांतील रेल्वेस्थानकांबाहेर एकापेक्षा अनेक अनधिकृत स्टँड निर्माण झाले असून रिक्षाचालक रांगेत न उभे राहता मनमानी करीत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी तर ते महिला प्रवाशांसोबतही अतिशय उद्धटपणे वागत असल्याचा अनुभव अनेक जणींना येत आहे. यामुळे शहरातील रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपणार कधी, असा प्रश्न महिलांकडून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना करण्यात येत आहे.
कोपरखैरणे येथील वरिष्ठा हाॅटेलनजीकच्या रिक्षा स्टँडवर कल्याण-डोंबिवलीवरून सोमवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास एनएमएमटी बसने आलेल्या एका महिला प्रवाशाने घणसोलीस जाण्यासाठी स्टँडवरील रिक्षाचालकांना विचारणा केली असता अनेकांनी नकार दिला. एक रिक्षाचालक तर मद्यधुंद अवस्थेत होता. तर दुसऱ्याने उर्मट वर्तन केले. याबाबत तिने जाब विचारताच इतर रिक्षाचालक मदतीस धावून आले. मात्र, आजूबाजूचे नागरिक तिच्या मदतीस धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. असाच अनुभव केवळ महिला प्रवाशीच नव्हे तर पुरुष प्रवाशांनाही येत आहे.
वाशी, सानपाडा आणि घणसोली रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षाचालकांची धटिंगणशाही, दादागिरी कशी चालते, याची आखोदेखी रोजच दिसते. घणसोलीत तर रात्री नऊ वाजल्यानंतर आडवेतिडवे कसेही उभे असलेले रिक्षाचालक गुटख्याच्या पिचकाऱ्या मारत उभे असलेेले दिसतात. कमीतकमी पाच प्रवासी हा येथील जी काही चार-पाच स्टॅँड आहेत, तेथील शिरस्ता आहे. यातील एक सोडले तर इतर स्टँड अनधिकृत आहेत. मात्र, पोलिस आणि आरटीओचे पाठबळ असल्याने रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपता संपत नसल्याचे दिसत आहे. सानपाडा-वाशीत तर रिक्षाचालकांनी रहदारीचा रस्ताच अडवलेला असल्याने स्थानकांतून बाहेर पडणेही कठीण होत आहे.