धोकादायक शेडची दुरुस्ती कधी होणार? प्रवाशांचा सवाल; वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार
By योगेश पिंगळे | Published: March 13, 2024 07:37 PM2024-03-13T19:37:18+5:302024-03-13T19:38:47+5:30
वाशी रेल्वे स्थानका बाहेरील लोखंडी शेड धोकादायक झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून या शेडचा वापर बंद करण्यात आला आहे.
नवी मुंबई: वाशी रेल्वे स्थानका बाहेरील लोखंडी शेड धोकादायक झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून या शेडचा वापर बंद करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शेडखाली जाणारा मार्ग बंद केला असला तरी स्थानकात ये -जा करणारे नागरिक या बंद परिसरातून वाट काढत आहेत. मागील महिन्यात या परिसरातून जाणारा एक व्यक्ती जखमी झाल्याची देखील घटना घडली आहे. परंतु या धोकादायक शेडच्या दुरुस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाशी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवेशद्वारावर रेल्वे पोलीस, रुग्णवाहिका आदी आपत्कालीन वाहने उभी करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून शेड उभारण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेर शेड असल्याने शेड खालून प्रवाशांची ये -जा सुरु असते. या शेडची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने यापूर्वी पावसाळ्यात देखील शेडचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली होती. मागील काही महिन्यांपासून सदर शेड धोकादायक स्थितीत असून त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. याबाबतचे फलक देखील परिसरात बसविण्यात आले असून या धोकादायक शेड खालून प्रवाशांनी ये -जा करू नये यासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.
यामुळे रघुलीला मॉलच्या बाजूने रेल्वे स्थानक गाठणाऱ्या आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वळसा मारून ये -जा करावी लागत आहे. काही नागरिक रस्ता बंद असलेल्या भागातून स्थानकात ये-जा करत आहेत. यामध्ये मागील महिन्यात एक नागरिक जखमी झाल्याची घटना देखील घडली आहे. मागील काही महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या शेडच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे आवश्यक होते मात्र याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. शेड दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.