रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:17 AM2021-05-06T00:17:58+5:302021-05-06T00:18:15+5:30
पनवेल तालुक्यातील स्थिती
मयूर तांबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत झाले आहे; मात्र अद्याप अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, धान्याचे वाटप लवकर करा, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब आणि गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू केलेत. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. ही घोषणा करून जवळपास महिना होत आला तरी पनवेल तालुक्यात अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली नाही.
पनवेलमध्ये एकूण १९३ रेशन धान्याची दुकाने आहेत. दरम्यान, मे महिन्यासाठी वाटप होणारे धान्य हेच मोफतचे धान्य असेल, अशी शक्यता आहे. याचवेळी केंद्र शासनाकडूनदेखील मोफत धान्य वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मे व जून अशा दोन महिन्यांसाठी पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गोरगरीब रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे; मात्र केंद्राकडूनदेखील मोफत धान्य वाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन धान्य वाटप करावे, तसेच राज्य शासनाने घोषणा केलेले धान्यदेखील लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे.
- सुधीर आंबेकर
हाताला काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केली; मात्र धान्याचे वाटप अद्याप रेशन दुकानातून झालेले नाही. मोफत धान्य तत्काळ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन किती दिवस आहे, यासंदर्भात काहीच माहिती नाही.
- रवींद्र पाटील
गेल्या वर्षापासून काम मिळणेदेखील कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षीदेखील दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे धान्याचे वाटप तत्काळ करावे.
- विकास खारुटकर
१० मे पर्यंत पनवेल तालुक्यातील सर्व दुकानांत धान्य पोहोचणार आहे. सध्या ४० रेशन दुकानांत धान्य पोच झाले आहे.
- स्मिता जाधव, पुरवठा अधिकारी- पनवेल
कार्डधारक
अंत्योदय ६०९४
बीपीएल आणि केशरी (प्राधान्य योजना ) ६२३६०
लोकसंख्या २,५६,२५५