‘कुठे पळताय? 'आम्ही पोलिस’; ठगांनी घेतली २ कोटींची खंडणी
By नामदेव मोरे | Published: March 31, 2024 05:43 PM2024-03-31T17:43:27+5:302024-03-31T17:43:36+5:30
वाशीत व्यापाऱ्यास लुटले : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोअरेजची देखभाल करणाऱ्या व्यावसायिकाला तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना वाशीमध्ये घडली आहे. कारवाई करण्याची धमकी देऊन २ कोटी रुपये घेऊन तोतया पोलिसांनी पलायन केले असून याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
घाटकोपर येथे राहणारे राजेश काटरा तुर्भे इंदिरानगर येथील फार्मीको कोल्ड स्टोअरेजच्या देखभालीचे काम करतात. शुक्रवारी सकाळी परिवारातील सदस्यांना विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. दीड वाजता घाटकोपर येथील घरी पोहोचले व तेथून कोल्ड स्टोअरेजला जाण्यासाठी कारमधून निघाले होते. सायन - पनवेल महामार्गावर वाशी उड्डाणपुलावरून पामबीच रोडवर उतरल्यानंतर त्यांच्या कारच्या समोर एक कार थांबली व मागे एक कार उभी राहिली. कारमधून उतरलेल्या दोघांनी आम्ही पोलिस आहोत. कुठे पळून चालला अशी विचारणा केली. मागील कारमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात एक व्यक्ती बसली होती. त्या सर्वांनी व्यावसायिकाविषयी सर्व माहिती सांगितली. त्याच्याकडे खूप पैसे असून त्याच्यासह परिवारातील सदस्यांना अटक करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या व्यावसायिकाने प्रकरण न वाढविण्याची विनंती केली. यानंतर तोतया पोलिसांनी त्याच्याकडे १५ कोटी रुपये मागितले. त्यांनी वाशी सेक्टर १७ मधील नातेवाइकांकडून दोन कोटी रुपये घेऊन संबंधितांना दिले व सुटका करून घेतली.
या घटनेनंतर एक तासाने त्याने कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली. दोन कोटी घेऊन गेलेले तोतया पोलिस असल्याची खात्री झाल्यामुळे याविषयी शनिवारी वाशी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.