खंडणीच्या वाट्यातील मोठी ‘भुते’ कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 07:13 AM2017-10-16T07:13:51+5:302017-10-16T07:15:01+5:30

 Who are the big 'demons' in the ransom? | खंडणीच्या वाट्यातील मोठी ‘भुते’ कोण?

खंडणीच्या वाट्यातील मोठी ‘भुते’ कोण?

googlenewsNext

नामदेव मोरे  
नवी मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराकडून १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार व संशयित आरोपींमधील मोबाइल संभाषण तपासामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये आम्हाला अनेक भुतांना शांत करायचे आहे. सर्वांना पैसे द्यायचे असल्याचे सांगून अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची नावे घेतल्याचे स्पष्ट झाले असून, ही मोठी ‘भुते’ नक्की कोण? त्यांचा काही संबंध आहे की फक्त त्यांच्या नावाने धमकावण्याचा प्रयत्न झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळामध्ये २००४पासून शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराने कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये काँगे्रसच्या परिवहन सदस्यांसह इतर दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शिक्षण मंडळामधील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आतापर्यंत शैक्षणिक साहित्य खरेदी व पुरवठ्यामध्ये घोटाळा झाल्याचे अनेक वेळा आरोप झाले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायच्या अगोदरच प्रत्यक्ष साहित्य बनविण्याचे काम सुरू असल्याचे आरोप सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आले होते. शैक्षणिक साहित्याचे नमुनेच सभागृहामध्ये मांडण्यात आले होते. शैक्षणिक साहित्य पुरविण्यामागे कोणत्या नेत्यांचा हात आहे, याविषयी अनेक वेळा तर्क-वितर्क लढविले जात होते. ठेकेदारांकडून पैसे उकळले जात असल्याच्या चर्चाही अनेक वेळा होत होत्या; परंतु यापैकी कोणताच आरोप कधी सिद्ध झाला नाही. आरोप करणारेही ठरावीक काळानंतर गप्प होत होते. या गप्प बसण्यामागे काय ‘अर्थ’कारण होते ते कधीच कळले नाही. ठेकेदार जयंतीलाल राठोड यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यानंतर आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चा खºया होत्या का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
तक्रारीमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे रवि मदन व संतोष काळे यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी जयंतीलाल राठोड यांना वाशीमधील हॉटेल नवरत्न येथे भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी त्यांनी दीड करोड रुपयांची मागणी केली. ही रक्कम खूपच मोठी असल्याने राठोड यांनी त्यांना ती कमी करण्यास सांगितली. त्या वेळी रवि मदन याने बाहेर जाऊन कोणास तरी फोन लावून हॉटेलमध्ये येऊन १ कोटी २५ लाख रुपयांच्या आतमध्ये जमणार नाही, असे सांगितले. तेव्हा त्यांना काही दिवसांमध्ये सांगतो, असे संबंधिताने स्पष्ट केले होते. हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीच राठोड यांनी सॅमसंग जे ७ या मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केले होते. या संभाषणामध्ये दोघांनी आम्हाला अनेक भुतांना शांत करायचे आहे. सव्वाकोटीमध्ये कोणाला पैसे द्यायचे त्यांची नावेही घेतली आहेत. यामध्ये अनेक मोठ्या राजकीय पदाधिकाºयांची व नगरसेवकांची नावे आहेत. या सर्वांचा यामध्ये काही सहभाग आहे की खंडणीची रक्कम वाढवून मागण्यासाठी वापर केला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


तपासाकडे सर्वांचे लक्ष

शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. काँगे्रसच्या पदाधिकाºयासह स्पर्धक ठेकेदाराचे संशयित म्हणून
नाव आले आहे.

च्याशिवाय मोबाइलमधील संभाषणामध्ये अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावाचा उल्लेख आहे. यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या राजकीय नेत्यांची चौकशी होणार व खरंच यामध्ये त्यांचा काही सहभाग आहे का याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

तक्रारदारावरही फसवणुकीचा आरोप

खंडणीचा गुन्हा दाखल करणाºया जयंतीलाल राठोड यांच्या कंपनीने खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेची कामे मिळविल्याचा आरोप यापूर्वीच संशयित आरोपींनी केला होता.

याविरोधात उच्च न्यायालयामध्येही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये ठेकेदाराने अनेक नामांकित कंपन्यांना साहित्य पुरविल्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडले असून, ती सर्व खोटी असल्याचे माहिती अधिकारामध्ये उघड झाले आहे.

Web Title:  Who are the big 'demons' in the ransom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.