लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एका व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या वादग्रस्त स्टेट्सवरून अचानक तणाव निर्माण झाला. यावरून दगडफेक आणि हाणामारीच्या घटना घडल्या. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अचानक काही लोकांनी औरंगजेबचे उदात्तीकरण सुरू केले आहे, यामागे कोण आहे, दंगेखोरांना कोण फूस लावत आहे, हे आपल्या लक्षात आले असून याची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी बुधवारी नवी मुंबईत दिली. नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत हाेते.
काही गोष्टी आम्हाला समजल्या आहेत. मात्र, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यावर सविस्तर बोलेन असे ते म्हणाले. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मात्र, काही नेते औरंजेबाला देशभक्त ठरवत आहेत. त्यामुळे तो कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहितेय. सर्व एकाचवेळी एका सुरात बोलतात व त्याला प्रतिसाद मिळतो याची चौकशी गरजेची आहे, असे फडणवीस म्हणाले.