डीपीएस तलावाला नेमका कोणापासून धोका? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

By नारायण जाधव | Published: June 20, 2024 04:44 PM2024-06-20T16:44:00+5:302024-06-20T16:45:44+5:30

नवी मुंबई महापालिकेने ते पर्यावरणप्रेमींसह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर काढल्यावर सिडकोने थेट महापालिकेेच्या विरोधातच पोलिसांत तक्रार केली आहे.

Who exactly threatens the DPS lake? The chief minister gave instructions for the inquiry | डीपीएस तलावाला नेमका कोणापासून धोका? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

डीपीएस तलावाला नेमका कोणापासून धोका? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

नवी मुंबई :नवी मुंबईतील नेरूळ येथील ३० एकरांवरील डीपीएस फ्लेमिंगो तलावाचे क्षेत्र व्यावसायिक फायद्यासाठी सिडको बुजवीत असल्याबाबत पर्यावरणप्रेमींनी केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. या तलावात भरतीचे प्रवाह येण्यासाठी असलेले चोक पाॅइंट सिडकोने बुजविले हाेते. मात्र, नवी मुंबई महापालिकेने ते पर्यावरणप्रेमींसह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर काढल्यावर सिडकोने थेट महापालिकेेच्या विरोधातच पोलिसांत तक्रार केली आहे. यामुळे डीपीएस तलावाला नेमका कोणापासून धोका आहे, याची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत.

संवर्धनासाठी हा तलाव नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी नॅटकनेक्ट फाउंडेशनने पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती केली होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने या तलावाचे संवर्धन करण्यासाठी तो महापालिकेकडेेे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सिडकोने हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवला असल्याचा नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे यांना हा प्रस्ताव लवकर मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार शिंदे यांनी याबाबत नगरविकास १ चे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना नॅटकनेक्ट फाउंडेशनने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

सिडकोने केले अनेक अटींचे उल्लंघन

येथील केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्याच्या वन विभागाने नेरूळ जेट्टीचे बांधकाम करताना भरतीच्या पाण्याच्या मुक्त प्रवाहात अडथळा आणू नये म्हणून घातलेल्या अटींचे सिडकोने उल्लंघन केले आहे. सिडकोने हमीपत्रातील अटी न पाळता तलावाच्या दक्षिणेकडील मुख्य जलवाहिनी बंद केली असून याला वनविभागाच्या पाहणीतून पुष्टी मिळाली आहे. तसेच तलावाकडे जाणाऱ्या इतर तीन वाहिन्याही सिडकोने बंद केल्या होत्या.

गणेश नाईक यांनी दिला होता इशारा

याबाबत पर्यावरणप्रेमींच्या आक्रोशावर आमदार गणेश नाईक यांनी तलावाला भेट देऊन चोक पॉइंट काढले नाहीत तर मी स्वत: ते जेसीबी लावून ते काढीन, असा इशारा दिला होता. यानंतर महापालिकेेने तेथील दोन ब्लॉक उघडल्यावर तलावात पाणी येऊ लागले असून फ्लेमिंगोंना अन्न मिळू लागले आहे. मात्र, आपला व्यापारी उद्देश साध्य करण्यासाठी सिडकोने नाराजी व्यक्त करून थेट नवी मुंबई महापालिकेेच्या विरोधातच एनआरआय सागरी पोलिसांकडे तक्रार केली. नगरविकास विभागांतर्गत दोन संस्था संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचल्याने नॅटकनेक्टने मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची विनंती केली होती. त्यानुसार शिंदे यांनी गुप्ता यांना चौकशी करण्यास सांगितले आहे.

‘ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात उतरणाऱ्या गुलाबी पक्ष्यांचे दुसरे घर असण्यासोबतच हा तलाव शहरातील पुरापासून बचाव करण्यासाठी ‘अर्बन स्पंज’ म्हणून काम करतो. यामुळेच आम्ही त्याचे संरक्षण करण्यासाठी उत्सुक आहोत,’ असे नवी मुंबई पर्यावरण संरक्षण सोसायटीचे व्यवस्थापकीय समिती सदस्य संदीप सरीन म्हणाले.

Web Title: Who exactly threatens the DPS lake? The chief minister gave instructions for the inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.