बांगलादेशींना मदत करणारा नगरसेवक कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:04 AM2020-01-11T00:04:04+5:302020-01-11T00:04:11+5:30
खांदेश्वर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर ६ येथून सोनाली अब्दुल खुददुस खान या बांगलादेशी महिलेला अटक केली.
मयूर तांबडे
पनवेल : खांदेश्वर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर ६ येथून सोनाली अब्दुल खुददुस खान या बांगलादेशी महिलेला अटक केली. महिलेला एका नगरसेवकाने मदत केली असून, त्या नगरसेवकाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, हा नगरसेवक कोण याची माहिती मिळू शकलेली नाही.
खांदेश्वर पोलिसांनी अटक केलेल्या सोनाली अब्दुल खुददुस खान या महिलेकडे शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, रेशन कार्ड ही खोटी शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. एका नगरसेवकाच्या मदतीने ही सारी बनावट कागदपत्रे बनवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे बांगलादेशी नागरिक सीमा पार करून भारतात प्रवेश करत आहेत. भारतात आल्यानंतर मिळेल ते काम करून पोट भरताना दिसत आहेत. याचाच फायदा राजकीय पुढारी घेत आहेत. ते त्यांची बांगलादेश देशाची ओळख लपवून ठेवण्यास मदत करत असल्याचे पुढे आले आहे. व्होटबँक सांभाळण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशा प्रकारे बाहेरच्या देशातून आलेल्या व बेकायदेशीररीत्या भारतात राहत असलेल्या परदेशी नागरिकांना भारतीय कागदपत्रे मिळवून देण्यास मदत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या महिलेला मदत करणारा ‘तो’ नगरसेवक कोण? याची माहिती मिळालेली नाही. या महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
>चिखले येथे घरजावई व नाव बदलून राहणारा मनोहर राहू पवार (इनामुल मुल्ला) यांच्याकडेही बोगस नावाने शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. रेशनिंग कार्ड व ग्रामपंचायतकडून पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. मात्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, मतदान ओळखपत्र यांची माहिती अद्यापही पोलिसांना मिळाली नाही. अद्याप या प्रकरणात तालुका पोलिसांनी बांगलादेशीला बोगस कागदपत्रे मिळवून देणाऱ्या व मदत करणाऱ्यांना अटक केलेली नाही, त्यामुळे पनवेल व आजूबाजूच्या परिसरात बांगलादेशी नागरिकांचे वाढते प्रमाण धोकादायक ठरू लागले आहे.