नवी मुंबई : पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होईल याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये सन १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला व डॉ. के. व्यंकटेशन यांची नावे चर्चेत आहेत. तर येत्या चार दिवसांत नव्या आयुक्तांची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी १ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गेला एक आठवडा आयुक्तपदाचा कार्यभार अप्पर आयुक्त विजय चव्हाण सांभाळत आहेत. परंतु आयुक्त अधिकारातील अनेक बाबी प्रसाद यांच्या राजीनाम्यापूर्वीपासून प्रलंबित आहेत. त्याकरिता लवकरच नव्या आयुक्तांची घोषणा होण्याची गरज व्यक्त करत त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर येत्या चार दिवसांत नव्या आयुक्तांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता देखील आहे. के. एल. प्रसाद हे राजीनाम्यावर ठाम असल्याने त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे समजते. रिक्त झालेल्या आयुक्त पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणे गरजेचे आहे. नवे उपआयुक्त रुजू झाले असून त्यांना ठरावीक कार्यभार मिळालेला नाही. रिक्त सहाय्यक आयुक्त पदांवर देखील चार दिवसांत नियुक्त्या होवून त्यांनाही कार्यभार सोपवण्याची वेळ येणार आहे. त्याकरिता नव्या आयुक्तांची नियुक्ती होणे गरजेचे झाले आहे. नव्या आयुक्तपदी नियुक्तीच्या चर्चेमध्ये रश्मी शुक्ला व डॉ. के. व्यंकटेशन यांची नावे आघाडीवर आहेत. हे दोघेही १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे दोघांमधूनच एकाची निवड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)...तर शहराला पहिल्या महिला आयुक्तनवी मुंबई पोलीसांच्या इतिहासात आयुक्तपदी आजतागायत महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे यंदा रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीची देखील अधिक शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आयुक्तपदी चर्चेत असलेल्या अधिकाऱ्यांची देखील नवी मुंबईत येण्याची इच्छा आहे का, ही बाब महत्त्वाची ठरत आहे.
आयुक्तपदी कोणाची वर्णी?
By admin | Published: June 08, 2015 4:08 AM