कोण होणार सिडकोच्या घरांचे भाग्यवंत? ४ हजार घरांसाठी १५,८०० अर्ज, मंगळवारी सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:13 AM2022-11-20T11:13:45+5:302022-11-20T11:14:15+5:30
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती. जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
नवी मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या चार हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पंधरा हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी या योजनेअंतर्गत घरासाठी अर्ज केले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २२ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून घराचे ४ हजार १५८ लाभार्थी निश्चित होणार आहेत.
सिडकोच्या नव्या गृहयोजनेची सर्वसामान्य ग्राहकांना नेहमीच प्रतीक्षा असते. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पातील शिल्लक असलेल्या ४ हजार १५८ घरांची योजना जाहीर केली होती.
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती. जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. या घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर उर्वरित ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.
अनामत रकमेत वाढ
दरम्यान, गरजू ग्राहकांनाच या योजनेअंतर्गत घरासाठी अर्ज करता यावा, यादृष्टीने सिडकोने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ७५ हजार तर सर्वसामान्य घटकातील अर्जदारांसाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम निश्चित केली आहे. याचा परिणाम म्हणून ज्यांना घर पाहिजे, अशाच ग्राहकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.