पाल्यातील गुंडशाही संपवणार कोण? ‘एपीएमसीसह पाेलिसांनी त्वरित कडक भूमिका घ्यावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:33 IST2025-01-18T12:32:32+5:302025-01-18T12:33:01+5:30

पोलिस व बाजार समितीने कडक भूमिका घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांना मार्केटच्या बाहेर हद्दपार करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Who will end the hooliganism in Palya? ‘Police along with APMC should take a strict stand immediately’ | पाल्यातील गुंडशाही संपवणार कोण? ‘एपीएमसीसह पाेलिसांनी त्वरित कडक भूमिका घ्यावी’

पाल्यातील गुंडशाही संपवणार कोण? ‘एपीएमसीसह पाेलिसांनी त्वरित कडक भूमिका घ्यावी’

नवी मुंबई : भाजीपाला मार्केटमधील पाला उचलण्याचा वाद  गोळीबारापर्यंत गेल्यामुळे बाजार समितीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. मार्केट स्वच्छतेचा अधिकृत ठेका दिलेला असताना सामाजिक संस्थांच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना अभय का दिले जात आहे, असा प्रश्न केला जात आहे.

पोलिस व बाजार समितीने कडक भूमिका घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांना मार्केटच्या बाहेर हद्दपार करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाजार समितीमध्ये  कोबी, फ्लॉवरचा पाला उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाल्यात दडलेल्या अर्थकारणामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

लाखोंच्या उलाढालीमुळे गुंडांचा शिरकाव
लाखो रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे तो उचलण्यासाठीच्या व्यवसायात गुंडांचाही शिरकाव झाला आहे.हाणामारी, धमक्या देणे व राडे हे नित्याचेच झाले आहेत. आता थेट गोळीबार करण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. अनेक वर्षांपासून पाल्यावरून वाद होत आहेत. गुन्हेगारी विश्वाशी संबंध असलेल्यांचा यामध्ये सहभाग आहे. 

शासनालाही द्यावा अहवाल
शासनाने सामाजिक संस्थांना पाला उचलण्यासाठी दिलेले काम योग्य नाही, हे बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारीही खासगीत बोलतात. येथील गुंडगिरी थांबविली पाहिजे, असेही सांगितले जात आहे. आता येथील स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून कचरा उचलण्याची जबाबदारी साफसफाई ठेकेदारांवरच सोपविण्यात यावी तरच गुन्हेगारीची साखळी मोडीत निघेल, असा सूर उमटू लागला आहे.

अनेकांवर दाखल आहेत गुन्हे 
काम करणाऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. वास्तविक, बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये साफसफाईसाठी अधिकृतपणे ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. सर्व कचरा उचलण्याची जबाबदारी या ठेकेदाराचीच आहे. ठेकेदारही जबाबदारी टाळत नाही. रात्रंदिवस स्वच्छतेचे काम सुरू आहे. यानंतरही फक्त कोबी, फ्लॉवरच्या पाल्याची जबाबदारी एखाद्या संस्थेवर किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना का दिली जात आहे, असा प्रश्न केला जात आहे. यावरून झालेल्या गोळीबारामुळे बाजार समितीच अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना अभय देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: Who will end the hooliganism in Palya? ‘Police along with APMC should take a strict stand immediately’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.