मनसेची मते कोणाला मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 02:00 AM2019-03-31T02:00:35+5:302019-03-31T02:01:00+5:30
गटबाजीची डोकेदुखी । संजय निरुपम आणि मनसेत आहे विळ्या भोपळ्याचे नाते
गेली १० वर्षे १५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे आहे. राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे या मतदार संघाचे २००९ पासून प्रतिनिधित्व करतात. विधानसभा असो की लोकसभा मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून मोदी लाटेत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना ४२ हजार ६३२ ची आघाडी येथून मिळाली होती. महायुतीचे गजानन कीर्तिकर यांना ८५ हजार ३६२ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गुरुदास कामत यांना ४२ हजार ७३० इतकी मते मिळाली होती. २००९च्या लोकसभा निवडणुकीत कामत यांनी यांनी कीर्तिकर यांचा पराभव केला होता. त्याची परतफेड २०१४च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी केली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला युती तुटली आणि शिवसेना व भाजपा एकमेकांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भाजपाच्या उज्वला मोडक यांचा २८ हजार ९६२ मतांनी पराभव केला होता. २००९च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ६४ हजार ३१८ तर काँग्रेसचे भाई जगताप यांना ५० हजार ५४३ तर मनसेच्या संजय चित्रे यांना २६ हजार ९३४ मते मिळाली होती. वायकर यांनी जगताप यांचा १३ हजार ७७५ मतांनी पराभव केला होता.
२०१७च्या पालिका निवडणुकीत विधानसभेपाठोपाठ सेना व भाजपा युती तुटली होती. यावेळी पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ४ भाजपा ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १ असे एकूण ८ नगरसेवक जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडून आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ५२ प्रीती सातम (भाजपा), प्रभाग क्रमांक ५३ रेखा रामवंशी (शिवसेना), प्रभाग क्रमांक ७२ पंकज यादव (भाजपा) यांचा अर्धा भाग या विभागात मोडतो. प्रभाग क्रमांक ७३ प्रवीण शिंदे (शिवसेना), प्रभाग क्रमांक ७४ उज्वला मोडक (भाजपा), प्रभाग क्रमांक ७७ अनंत नर(शिवसेना), प्रभाग क्रमांक ७८ सौफी जब्बार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग क्रमांक ७९ सदानंद परब (शिवसेना) यांचा अर्धा विभाग या प्रभागात मोडतो. येथे कामगार वस्ती, गरीब, कष्टकरी आणि झोपडीत राहणारे नागरिक तर दुसरीकडे जोगेश्वरी लिंक रोडला मोठ्या प्रमाणात असलेल्या गनचुंबी इमारतीत राहणारे नागरिक असा हा मतदार संघ आहे. मतदार संघात गांधी नगर, प्रेमनगर, मेघवाडी, सर्वोदयनगर, कोकणनगर, पीएमजीपी, दुर्गानगर, सारीपूत, दत्तटेकडी, शिवटेकडी, रामवाडी हे भाग मोडतात.
राजकीय घडामोडी
च्हा मतदार संघ युतीचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसचा प्रभाव कमी जाणवतो.
च्खासदार गजानन कीर्तिकर यांची लढत संजय निरुपम यांच्या बरोबर आहे. त्यामुळे येथे काँग्रेसची त्यांची खरी कसोटी आहे.
च्विधानसभा मतदार संघात एकूण ८ प्रभाग येतात. यामध्ये शिवसेनेचे ४ नगरसेवक, भाजपाचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ नगरसेवक आहे.
च्कामत गटाबरोबर निरुपम यांचा संघर्ष आता तरी मिटून कामत गट निरुपम यांच्या निवडणुकीत सक्रिय होईल का हा प्रश्न आहे.
दृष्टिक्षेपात राजकारण
२०१४ च्या निवडणुकीत मनसेचे महेश मांजरेकर यांना येथून १६,४३१ इतकी मते मिळाली होती. यंदा मनसे निवडणुकीच्या रिंगणातच नाही. संजय निरुपम आणि मनसे यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला सामावून घेण्यास निरुपम यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे मनसेची मते येथून कोणाला मिळणार हा प्रश्न आहे.
आदिवासी पाड्यांना वीजच नसून त्यांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, एसआरएच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न असून ज्याठिकाणी एसआरए प्रकल्प झाले आहेत त्यांना ओसी नसल्याने पाणी व अन्य सुविधांचा अभाव आहे.
या मतदार संघात मराठी १३५,५००, उत्तर भारतीय ५३,७००, अल्पसंख्यांक ३९,०००, गुजराथी/राजस्थानी २०,९००, दक्षिण भारतीय २०,२००, ख्रिश्चन ५,९०० आणि इतर १,५०० अशी एकूण मतदारांची संख्या २,७७,२६२ इतकी आहे.