नवी मुंबई : सीवूड येथील इमारतीमध्ये आग विझविताना सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना ऐरोली येथील बर्न रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या जवानांच्या उपचारांचे बिल कोण भरणार आहे, असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी गुरु वार, २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत प्रशासनाला केला. अग्निशमन जवानांच्या वैद्यकीय खर्चाचा प्रस्ताव लवकरच सभागृहात मान्यतेसाठी जाणार असल्याचे आश्वासन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सभागृहाला दिले.
सीवूड येथील पामबीचलगतच्या २२ मजली टॉवरमधील फ्लॅटला ८ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे पाच तास परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. त्या वेळी झालेल्या सिलिंडर स्फोटात सात अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांचे बिल हे १२ लाख रु पयांपर्यंत झाले असून कोणी भरायचे, हा जवानांच्या नातेवाइकांसमोर मोठा पेच निर्माण झाला असल्याचे विरोधी पक्ष नेते चौगुले यांनी सांगितले. प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अशा प्रसंगी दुर्दैवाने एखादा अधिकारी किंवा कर्मचारी मृत्युमुखी पडला तर त्याच्या कुटुंबीयांना २५ ते ५० लाखांची मदत करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. महापौर जयवंत सुतार यांनी या जवानांच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी फंडाची तरतूद करावी तसेच जखमी जवान पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांचे वेतन सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आग विझविताना घडलेला प्रकार गंभीर आहे. या जवानांच्या वैद्यकीय खर्चाचा प्रस्ताव लवकरच करण्यात येणार आहे.