डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो...माझ्यासमोर यायची पोलिसांची ताकद नाही
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 3, 2023 08:12 PM2023-09-03T20:12:58+5:302023-09-03T20:13:21+5:30
खंडणीखोर पत्रकारावर गुन्हा
नवी मुंबई :पत्रकार असल्याचे सांगून अवैध धंद्याची बातमी टाळण्यासाठी ५० हजार गुडलक व महिना २० हजाराची मागणी करणाऱ्यावर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो, माझ्यासमोर यायची पोलिसांची ताकद नाही असे धमकावत पैसे मागितले जात होते. यासंबंधीची तक्रार प्राप्त होताच रविवारी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
एकनाथ शिवराम अडसूळ (४७) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या कथित पत्रकाराचे नाव असून तो खारघरचा राहणारा आहे. वाशी येथील एका व्यक्तीला तो खंडणीसाठी धमकावत होता. सदर व्यक्ती घरात जुगाराचा अड्डा चालवत असल्याचा त्याचा आरोप होता. यामुळे त्याच्या विरोधात बातमी न छापण्यासाठी तसेच पोलिसांकडे तक्रार न करण्यासाठी तो गुडविल स्वरूपात ५० हजार तर महिना २० हजाराची मागणी करत होता. तडजोड करून गुडविल ३० हजार रुपये तर महिना १० हजार रुपये घेण्याचे त्याने मान्य केले. दरम्यान त्याचे संभाषण संबंधित व्यक्तीने रोकॉर्ड करून पोलिसांकडे देऊन त्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार रविवारी सापळा रचून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर खंडणी मागणाऱ्या एकनाथ अडसूळ याचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामध्ये अडसूळ हा संबंधित व्यक्तीवर त्याची छाप पाडण्यासाठी आपला पेपर लय डेंजर आहे. माझ्यासमोर यायची कोणाची ताकद नाही. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो... असे वक्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. शिवाय आपल्याला खंडणी दिल्यानंतर मांडवली झाली असं पोलिसांना सांगून पुन्हा धंदा सुरु करायचा असा सल्लाही देताना दिसून येत आहे. त्याद्वारे तक्रारदार याचा अवैध धंदा होता का ? याचीही चौकशी वाशी पोलिस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी कोपर खैरणेत बार चालकाकडे खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारावर कोपर खैरणे पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर वाशीत हा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी एपीएमसी परिसरात देखील तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुटला होता. तर नेरूळमध्ये स्पा चालकांकडे खंडणी उकळणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.