मावळमधील घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:11 AM2019-05-01T00:11:59+5:302019-05-01T00:12:20+5:30
लोकसभा निवडणूक : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात उत्साह; आता निकालाबाबत उत्सुकता
हणमंत पाटील
पिंपरी : मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत २ टक्क्याने घसरला आहे. साधारण शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला असून, ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह चांगला होता. त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.
राज्यातील चौथ्या टप्प्यात मुंबई, उत्तर महाराष्ट्रासह शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुका सोमवारी झाल्या. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची व लक्षवेधी ठरली आहे. मावळ मतदारसंघाच्या रचनेत घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा, तसेच घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघ आहेत. सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन भाजपा, दोन शिवसेना व एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना युतीची ताकद अधिक आहे. मात्र, राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसची साथ मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चुरशीची लढत दिली आहे.
२०१४ च्या निवडणुकीत उरण, कर्जत व मावळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होती. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का ६०.११ टक्के झाला होता. यंदा मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात चुरस असूनही मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला आहे. साधारण सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का ५८.२१ होता. यामध्ये सर्वाधिक मतदान उरणमध्ये ६१.८० टक्के आणि मावळ मतदारसंघात ६१.२८ टक्के झालेले आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदानाची टक्केवारी गतपंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत ८ ते १० टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, घाटावर पिंपरी व चिंचवड मतदारसंघात दोन ते तीन टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे.
गतपंचवार्षिक निवडणुकीत घाटाखाली उरण मतदारसंघात ७१.८४ टक्के, कर्जत ६८.३८ टक्के आणि पनवेल ५८.४८ अशी मतदानाची टक्केवारी होती. येथील वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शिवसेनाविरोधी असलेले शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना झाला होता. या निवडणुकीत घाटाखालील तीनही मतदारसंघातील मतदानाच्या टक्क्यात ५ ते १० टक्के घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवडचा वाढला टक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग १५ वर्षे सत्ता असलेले अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या चुरशीची लढत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मतदानाचा टक्का गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा वाढलेला आहे. त्याचा फायदा बारणे की पार्थ पवार यापैैकी कोणाला होणार याची उत्सुकता आहे.