नवी मुंबई - गणपती बसवण्यासाठी महापालिका आणि सरकारकडून जागा निश्चित केली जात आहे. मग गणपती कपाटात बसवू का ?. सगळ्या धर्मांना नियम का नाहीत. रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत, सगळ्या धर्मांना समान न्याय हवा, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार आणि महापालिकेंवर तोफ डागली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकारला प्रश्न विचारला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर राज यांनी प्रकाश टाकला. सरकार करोडो कोटींच्या घोषणा करते, पण देशातील रिक्त जागा का भरत नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच एका वर्तमानपत्राचा संदर्भ देत, देशात 24 लाख जाग रिक्त असल्याचेही राज यांनी म्हटले. देशात 24 लाख जागा रिक्त आहेत. पण सरकार या जागा का भरत नाही. याची कारणे म्हणजे सरकार काम करत नाही, सरकारकडे पैसै नाहीत किंवा सरकारची इच्छाच नाही, असे राज यांनी म्हटले. देशातील 24 लाख जागांची वर्गवारी करताना, 10 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 5 लाख 40 हजार पोलिसांच्या जागा रिक्त, 2 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका आहेत. तर आरोग्यसेवकांच्याही लाखो जागा रिक्त असल्याचे राज यांनी सांगितले. सरकार केवळ घोषणा करते, काम काहीही नाही. मीही नवी मुंबईसाठी 50 हजार कोटी देण्याची घोषणा करतो, असा उपरोधात्मक टोलाही राज यांनी लगावला.
आगामी गणेशोत्सवासाठी सरकार जागा निश्चित करुन देणार आहे. याबाबत बोलताना राज्य सरकार आणि महापालिकेवर राज यांनी तोफ डागली. जर सरकारच गणपती मंडळासाठी जागा ठरवणार असले तर, मग गणपती कपाटात बसवू का ?. सगळ्या धर्मांना नियम का नाहीत. रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत, सगळ्या धर्मांना समान न्याय हवा, असा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला. देशातील आंदोलनावरुनही राज यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच आंदोलानातून मराठी तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचेही राज यांनी म्हटले.
राज यांच्या भाषणातील मुद्दे -
* सरकारचे देशावर हिप्नॉटिझम चे प्रयोग सुरू आहेत, जसजशा निवडणूक येतील मी मागची आठवण करून देईल.* सगळ्या खासगीसंस्था, नोकऱ्या आहेत कुठे ? जे चाललंय त्यात हात घालायच्याऐवजी योगा करत बसले, असा मोदींना टोला. नोटबंदीनंतर साडेतीन कोटी नागरिकांची नोकरी गेली. * मराठीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आजुबाजूला काय चाललंय यावर नागरिकांचीही नजर पाहिजे. जन्माला आलोय म्हणून जगू नका, जन्माला काहीतरी अर्थ उद्देश पाहिजे.* फक्त नोकऱ्यांची संघटना नको, जागता पहारेकरी म्हणून काम करा. मात्र मोदींसारखा पहारेकरी नको.* महाराष्ट्रात बांग्लादेशींचे मोहोलले उभे राहत आहेत. झोपड्या उभारून एसआरए राबवाययचा आणि पैसे कमवायचे. जागा गिळण्यासाठी राज्याबाहेरुन लोक आणली जात आहेत.* प्रत्येक धर्माला सरकारने न्याय द्यावा, * मराठीच अस्तित्व पुसलं जाणार नाही याची काळजी घ्या* हिंसा करणाऱ्यांचा महाराष्ट्राचा संबंध नाही. बदनाम मात्र तुम्ही होताय. हक्क घेताना मनगटे पण आपली पाहिजेत.