‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न
By नारायण जाधव | Published: December 16, 2022 07:27 AM2022-12-16T07:27:55+5:302022-12-16T07:29:13+5:30
जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत.
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जगातील विविध देशांनी स्थापन केलेल्या जी-२० परिषदेच्या २०२२-२३ या वर्षांचे यजमानपद भारताकडे आल्यानंतर तिच्या बैठकांचा प्रारंभ मुंबईत झाला. यात मुंबईसह पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. मात्र, नवी मुंबईत जी-२० ची बैठक सोडाच; पण प्रतिनिधींची साधी भेट ठेवलेली नाही. यावरून शहरवासीयांत नाराजी आहे. जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची बैठक नाही किमान नवी मुंबई शहरात भेट ठेवावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.
जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत. वास्तविक, नवी मुंबई शहर देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानात सातत्याने पहिल्या दहामध्ये येणारे राज्यातील एकमेव सुंदर आणि स्वच्छ शहर आहे.
प्रतिनिधींच्या भेटीसाठी सरकारला करणार विनंती
आशिया खंडातील सर्वात मोठी टीटीसी औद्योगिक वसाहत, रिलायन्स समूहाचा पसारा, केंद्र सरकारचे वाशी स्थानकातील इन्फोटेक पार्क, महाराष्ट्र सरकारचे एमआयडीसीतील मिलेनियम बिझनेस पार्क, सिडकोने बांधलेली देखणी रेल्वेस्थानके दाखविता येतील. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज कसे चालते, ती महामुंंबईतील तीन ते चार कोटी लोकांची भूक कशी भागविते, हे जी-२० समूहाला दाखविण्यासाठी प्रतिनिधींच्या भेटी नवी मुंबईत व्हाव्यात, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती करू, असे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले.
n जेएनपीटी बंदर, वेगाने आकार घेत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, परिसरातील लॉजिस्टिक पार्क, मेडिकल व अभियांत्रिक शिक्षण संस्थाचे जाळे जी-२० समूहाला दाखविण्याची संधी असल्याचे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या.
n मुंबई हे जुने शहर आहे. पण नवी मुंबई हे नवे अत्याधुनिक शहर आहे. आता नैना विकसित होत आहे.
n शहरातील लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न करून नवी मुंबईला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यावे, असे मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना महाराष्ट्रचे महासचिव प्रकाश बाविस्कर म्हणाले.